राजापूर : सोलगावात कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांसमवेत बांधला श्रमदानातून बंधारा

राजापूर : पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ग्रामसेवक हातामध्ये पेन आणि कागद घेऊन विकासाचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करताना दिसतात. मात्र, कलम हाती असलेल्या त्याच अधिकारी अन् कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांसमवेत कुदळ अन् फावडा घेऊन सोलगाव येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. त्यामुळे या परिसरातील पाण्याची तीव्रता कमी करणे शक्य झाले आहे.

मिशन बंधारे उपक्रमांतर्गत तालुक्यातील सोलगाव येथे पंचायत समिती कृषी विभाग, राजापूर ग्रामपंचायत अधिकारी संघटना, ग्रामपंचायत सोलगाव, बचतगट आणि ग्रामस्थ यांनी संयुक्त विद्यमाने नुकताच वनराई बंधारा बांधला. त्यामध्ये जिल्हा शेती अधिकारी (सामान्य) मुळीक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नीलेश जगताप, कृषी अधिकारी सुर्वे यांच्यासह कृषी, ग्रामपंचायत विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, उमेद अभियान विभाग, आदी विभागांतील अधिकारी, कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. या बंधाऱ्यामध्ये चांगलाच पाणीसाठा झाला असून, हा पाणीसाठा भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.

तालुक्याला दरवर्षी एप्रिल-मे महिन्यामध्ये पाणीटंचाईची झळ पोहचते. मुबलक प्रमाणात पडणारा पाऊस आणि त्यानंतर पाणीटंचाई दूर करणासाठी विविध नळपाणी योजनांच्या माध्यमातून शासनाकडून खर्च करण्यात येणारा लाखो रुपयांचा निधी असतानाही तालुक्याची पाणीटंचाईतून मुक्तता झालेली नाही. ही टंचाई दूर करण्यासाठी पंचायत समितीतर्फे दरवर्षी संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी नियोजन केले जाते; मात्र, हे नियोजनही फोल ठरताना दिसते. या साऱ्या स्थितीवर मात करण्यासाठी दरवर्षी पंचायत समितीच्या नियोजनानुसार ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून गावोगावी बंधारे बांधण्यात येतात. त्याप्रमाणे यावषाँही लोकसहभागातून ठिकठिकाणी बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे.

जलस्रोत असलेल्या तालुक्यातील विविध ठिकाणी सध्या ग्रामपंचायती लोकसहभागातून बंधारे बांधत आहेत. संभाव्य पाणीटंचाईच्या काळात उपयुक्त ठरणाऱ्या मिशन बंधारे उपक्रमामध्ये प्रशासकीय कार्यालयांमध्ये नेहमी दिसणारे अधिकारी आणि कर्मचारीहो सहभागी होऊ लागले आहेत.

डोक्यावर घमेलं, हातात पिशवी
सोलगाव येथे नुकताच पंचायत समितीचा कृषी विभाग, राजापूर ग्रामपंचायत अधिकारी संघटना, ग्रामपंचायत सोलगाव, बचतगट आणि ग्रामस्थ यांनी संयुक्त विद्यमाने नुकताच वनराई बंधारा बांधला. यावेळी ग्रामस्थांसमवेत अधिकारी आणि कर्मचारी हातामध्ये कुदळ-फावडा घेत प्रत्यक्षात सहभागी झाले होते. काही अधिकारी-कर्मचारी डोक्यावर घमेल्यातून माती वाहून नेताना तर काहीजण पिशव्यांमध्ये माती भरून नेतानाचे चित्र दिसत होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 18/Dec/2024