खेड : तालुक्यातील सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या शिवतर गावात शिवतर-कोडबा येथे मृदू व जलसंधारण विभागामार्फत मातीच्या धरणाचे काम सुरू आहे. धरण परिसरासह आजूबाजूच्या परिसरात मातीसाठी खोदकाम केले आहे. त्यामुळे नामदरेवाडीकडे जाणारा रस्ता पावसाळ्यात वाहून गेला आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे शिवतर-नामदरेवाडी येथील ग्रामस्थांनी मृदू व जलसंधारण विभागाचे आयुक्त यांच्याकडे केली आहे. या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास पावसाळ्यात शिवतर गावातील नामदरेवाडीचा संपर्कच तुटेल, असे ग्रामस्थांचे मत आहे.
शिवतर गावात जल व मृद संधारण खात्यामार्फत कोडबा धरण प्रकल्पाचे काम सुरू आहे. या गावातील दोन डोंगरांच्या मध्यभागी मातीची भिंत उभारून पाणी अडवले जाणार आहे. या कामासाठी शिवतर-नामदरेवाडी रस्त्याच्या बाजूला असलेला संपूर्ण डोंगर खोदण्यात आला आहे त्याशिवाय या भागातील मोठमोठे दगड फोडण्यास क्लास्टिंग तंत्रज्ञानाचाही वापर केला असल्यामुळे भूस्खलनाची शक्यता बळावली आहे. शिवतर गावातील दत्तवाडी ते नामदरेवाडीपर्यंत २.१७५ किलोमीटर लांबीचा रस्ता रत्नागिरी जिल्हा परिषद ग्रामीण मार्ग क्र. ६६ म्हणून नोंदवलेला आहे. भौगोलिक रचनेनुसार, डोंगराळ दऱ्याखोऱ्यांतोल या रस्त्याची संपूर्ण दूरवस्था झाली आहे. त्याचबरोबर शिवतर-कोडवा धरण प्रकल्पामुळे रस्त्याच्या बाजूने दगड आणि मातीचे खोदकाम झाले आहे. १४ जुलै २०२४ ला मुसळधार पावसात हा रस्ता ठिकठिकाणी वाहून गेला. त्यामुळे नामदरेवाडीकडे जाणाऱ्या या एकमेव मुख्य रस्त्यामुळे गावकऱ्यांचे पूर्ण दळणवळण बंद पडले आहे. तसेच या वाडीवर ये-जा करण्यास दुसरा कुठलाही मार्ग उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
संरक्षक भिंतीची मागणी
नामदरेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीसह परिसरात धोकादायक बनलेल्या ठिकाणी जल व मृद संधारण विभागाने संरक्षक भिंत उभाराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांच्यावतीने शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था, मुंबईचे सचिव सुनील मोरे यांनी मृद व जलसंधारण विभागाचे अप्पर आयुक्त यांच्याकडे केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 18/Dec/2024









