दापोली : आवक घटल्याने कोळंबीची १०० रुपये किलो दराने विक्री

दापोली : उत्तरेकडील वेगवान वाऱ्यांमुळे समुद्राला उधाण आले आहे. त्याचा परिणाम मासळीवरही झाला आहे. हर्णे बंदरात मासळीची आवक घटली असून, म्हाकुळ, कटहलसारखी मासळी गायबच झाली आहे. तसेच ४० रुपये किलोने मिळणारी कोळंबी आता १०० रुपयांनी विकत घेण्याची वेळ आली आहे. सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे त्यांना मासे खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत आहे.

दापोलीत पारा घसरल्यामुळे चांगलाच गारठा पडू लागला आहे. पारा ९ अंशावर आता असून, पुढे आठवडाभर असेच वातावरण राहील, असा अंदाज आहे. या वातावरणामुळे आंबा बागायतदार सुखावला असता तरीही मच्छीमार धास्तावलेले आहेत उत्तरेकाहीत राज्यांमधून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे खोल समुद्रात तीव्र लाटा आहेत. पाण्याला करंट असल्यामुळे मासळी खोल पाण्यात गेली आहे.

पृष्ठभागावर मासेच मिळत नसल्यामुळे मासेमारीसाठी गेलेल्यांच्या जाळ्यात मासाळी मिळत नाही. जो मिळतो तोही अल्पच आहे. आवक घटल्यामुळे खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी अवस्था मच्छीमारांची झाली आहे कटहल, म्हाकुळाचा दर सध्या ३०० ते ३२५ रुपये किलो आहे सुरमई ७०० रुपये असून पापलेट, हलवा यांचे दरही गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे येथील मच्छीमारांना आर्थिक संकटाला चांगलेच सामोरे जावे लागत आहे.

हंगाम चालू झाल्यापासूनच फास्टर नौका आणि एलईडी मासेमारीने अवैधरीत्या मासेमारी करून हर्णे बंदरातील मच्छीमारांची चांगलीच दमछाक झाली आहे. मासेच मिळत नसल्याने मच्छीमार हवालदिल झालेले आहेत.

पुढे आठवडाभर दापोलीमधील वातावरण थंडच राहणार आहे. यापेक्षाही कडाक्याची थंडी पडू शकते. पारा घसरू शकतो. परंतु पारा किती खाली येईल, हे आताच सांगता येणार नाही. – डॉ. विजय मोरे, हवामान अधिकारी, कोकण कृषी विद्यापीठ

उत्तरेकडून जाता जोरदार वारे वाहत आहेत त्यामुळे समुद्रात मासेमारी करायला जाता येत नाही त्यामुळे अपेक्षित मासळी मिळत नाही. आमचे ट्रॉलर आठ आठ दिवस मासेमारीला जातात आणि खूपच कमी मासळी घेऊन येतात. त्यामुळे खर्च जास्त आणि मिळकत कमी अशी आमची स्थिती आहे. मासेमारी व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. फास्टर नौका आणि एलईडी मासेमारी यामुळे पारंपरिक मासळी उद्योग संपायला आला आहे. – बाळकृष्ण पावसे, कार्याध्यक्ष, मच्छीमार संघटना, दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:13 PM 18/Dec/2024