चिपळुणात महामार्गाचे काम संथगतीने

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाचे काम २०१४ पासून सुरू आहे. मात्र, अजूनही ते पूर्णत्वास गेलेले नाही. तसेच गुहागर-विजापूर महामार्गचे काँक्रीटीकरणही रखडले आहे. महामार्ग बांधताना अनेक त्रुटी असल्याने अपघात होत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने दखल न घेतल्यास २६ डिसेंबरपासून सती येथे रास्ता रोको करण्यात येईल, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिले आहे.

अडरेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मुंबई-गोवा महामार्ग अद्याप पूर्ण होत नाही. गेली तीन वर्षे परशुराम घाटात सातत्याने अपघात होत आहेत. दरडी कोसळणे, खचणे असे प्रकार घडत असल्याने वेळोवेळी वाहतूक खंडीत होत आहे. त्याचप्रमाणे गुहागर-विजापूर मार्गावरील पिंपळी कॅनॉल परिसरात रस्त्याची दुर्दशा झाली आहे. सती पूल कामानिमित्त एका बाजूकडून दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी खड्डेदेखील पडले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. त्याच पद्धतीने चिपळूण शहरातील उड्डाण पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. या कामाला अजूनही गती मिळालेली नाही. सर्वच कामे रखडली आहेत.

चिपळूण शहरातील सर्व्हिस रोडचे कामदेखील अपूर्णच आहे. विशेषकरून पॉवर हाऊस ते कापसाळा दरम्यानचा सर्व्हिस रोड अद्याप पूर्ण झालेला नाही. गुहागर बायपास रोड पागमळा या ठिकाणी सर्व्हिस रोडचे काम धीम्या गतीने सुरू आहे. या कामात प्रगती होताना दिसून येत नाही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे या कामाला गती मिळालेली नाही त्यामुळे या बाबत आमच्याकडे अनेक तक्रारी येत आहेत. या बाबत तातडीने विचार करून काम मार्गी लावावे अन्यथा दि. २६ डिसेंबर रोजी सती या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा अडरेकर यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 18/Dec/2024