राजापूर : राजापूर शहरातील बिबटयाच्या मुक्त संचाराबाबत आमदार किरण सामंत यानी तात्काळ कार्यवाहीच्या वनविभागाला दिलेल्या सूचनांची राजापूर वनविभागाने अंमलबजावणी सुरू केली असून ज्या भागात बिबट्याचे दर्शन झाले त्या झरी रोड परिसरात बिबटयाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने लोखंडी पिंजरा लावला आहे. राजापूर शहर व परिसरात गेले काही दिवस बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, सौ. साजीया काझी गिरकर व शिवसेना शहर प्रमुख सौरभ खडपे यांनी आमदार सामंत यांच्याकडे लेखी निवेदन देवून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत वनविभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दयाव्यात अशी मागणी केली होती.
याबाबत आमदार सामंत यांनी राजापूर वनपाल जयराम बावदाणे यांना प्रत्यक्ष पाहणी करून बिबटयाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. याची दखल घेत वनविभागाने सर्वेक्षणाअंती शहरात झरीरोड परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लोखंडी पिंजरा लावला आहे.
राजापूर शहर परिसरात आता बिबट्याच्या तीन बछड्यांचे दर्शन राजापूर शहर परिसर आणि बाजारपेठेत बिबट्याचे दर्शन होत असताना सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान रूमडेवाडी येथे माजी आमदार गणपत कदम यांच्या बंगल्याच्या आवारात बिबटयाचे तीन बछडे दिसून आले आहेत. माजी आमदार कदम यांच्या बंगल्याच्या आवारात नंदकिशोर आंबोळकर हे केअर टेकर म्हणून वास्तव्यास आहेत. त्यांना रात्री 9 वाजता हे तीन बछडे दिसून आले. या बंगल्या नजीक जंगल भागात भुयार असून या ठिकाणी बिबट्या मादी राहत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. बिबटयांच्या मुक्त संचारामुळे या परिसरात सायंकाळी 7 वाजल्यानंतर फिरणे धोकादायक बनले असून वनविभागाने या बिबटयांचा शोध घेवून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:14 PM 18/Dec/2024









