रत्नागिरी : भरधाव डंपरखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

रत्नागिरी : भरधाव डंपरची समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. जाकीर मलंग रिफाई (वय २२, रा. क्रांतिनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) असे अपघातातील मृताचे नाव आहे. ही घटना मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील झाडगाव एमआयडीसीमधील अल्ट्राटेक कंपनीसमोरील रस्त्यावर १८ डिसेंबर रोजी सकाळी ६.४५ वा. सुमारास घडली.

याबाबत त्याच्या मेहुण्याने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, जाकीर हा परटवणे येथील मटण शॉपमध्ये कामाला होता. बुधवारी सकाळी ६.४५ वा. सुमारास तो आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच ०८-एव्ही-५६७३) घेऊन क्रांतीनगर ते परटवणे असा जात होता. त्याच सुमारास अज्ञात डंपर चालक आपल्या ताब्यातील डंपर (एमएच-०८-एपी-३०७०) घेउन परटवणे ते चर्मालय असा येत होता.

ही दोन्ही वाहने सकाळी ६.४५ वा. सुमारास चंपक मैदानाजवळील अल्ट्राटेक कंपनीच्या समोर आली असता, भरधाव डंपरची जाकिरच्या दुचाकीला समोरुन धडक बसली. यात जाकीर हा डंपरच्या मागील चाकाखाली फेकला गेल्याने त्याचा जगीच मृत्यू झाला. हा अपघात झाल्यानंतर डंपर चालकाने अपघाताची खबर न देताच घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत
घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. या अपघातप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 19/Dec/2024