रत्नागिरी : विविध मराठा मंडळे आणि मराठा संस्था यांच्या अखिल मराठा फेडरेशनने १८ व १९ जानेवारी २०२५ रोजी येथे मराठा समाजाचे महासंमेलन आयोजित केले आहे. या फेडरेशनमध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या ५५ विविध संस्था सभासद झालेल्या असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थांचाही यात समावेश आहे. कार्यक्रमाचे सहआयोजक मराठा मंडळ, रत्नागिरी आणि क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी आहेत.
हॉटेल विवेक येथे पहिल्या दिवशी सकाळी ९ वाजता उद्घाटन, पुरस्कार वितरण, स्मरणिका प्रकाशन, मान्यवरांचे मार्गदर्शन व चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता उच्च विद्यार्जन आणि उद्योग व्यवसायासंबंधी आणि महिलोपयोगी चर्चासत्रे आणि मार्गदर्शन व पुरस्कार वितरणाचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र आणि देशभरातून हजारो मराठा बंधू-भगिनी या संमेलनासाठी येणार आहेत. गावागावांतील मराठा मंडळ सहभागी करून घेण्यात येत आहेत. ‘मराठा जोडो’ हे अभियान राबविताना विविध रचनात्मक उपक्रम व चळवळीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील व तळागाळातील मराठा समाज संघटित करण्यासाठी क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी आणि मराठा मंडळ रत्नागिरी यांच्या पुढाकाराने अखिल मराठा फेडरेशनच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 19/Dec/2024














