रत्नागिरी : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या छंदोत्सवांतर्गत गेली ३२ वर्षे अविरत चालू असलेल्या शामराव करंडक एकांकिका स्पर्धेच्या करंडकावर ”सलंग” या एकांकिकेने आपली मोहोर उमटवली. द्वितीय क्रमांक गडप आणि तृतीय डेअर या एकांकिकेला मिळाला. शब्द एक आविष्कार अनेक या स्पर्धेच्या संकल्पनेतंर्गत यावर्षी ‘अस्तित्व’ हा शब्द देण्यात आला होता. या शब्दाचे अनेक कंगोरे उलगडणाऱ्या एकांकिका या स्पर्धेतंर्गत सादर झाल्या.
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना आणि कल्पकतेला वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, ध्वनी या सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनी पार पाडल्या. यातून रंगभूमीवरील भावी कलाकार घडतात. या स्पर्धेचे परीक्षण गणेश गुळवणी आणि शशिकांत महाजन यांनी केले. विजेत्यांना रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी राजन मलुष्टे, आजी-माजी शिक्षक, रत्नागिरी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि माजी विद्यार्थी यांनी विविध व्यक्तींच्या स्मरणार्थ बक्षिसे प्रायोजित केलेली असतात. विजेत्या संघाला फिरता चषक देण्यात आला. या स्पर्धेतील पारितोषिक वितरण खातू नाट्यमंदिरच्या रंगमंचावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, सचिव सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, उद्योजक राजन मलुष्टे, आजीव सभासद मंडळ सचिव प्रा. महेश नाईक, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक विद्याधर केळकर, विज्ञान शाखाप्रमुख दिलीपकुमार शिंगाडे, वाणिज्य विभागप्रमुख शिल्पा तारगावकर, छंदोत्सव प्रमुख आणि कला शाखाप्रमुख वैभव कानिटकर उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल असा…
दिग्दर्शन- वरद आरेकर (गडप), आर्या भोळे (सलंग), हर्ष भाटकर (गायब), सर्वोत्कृष्ट लेखन आर्या भोळे (सलंग), मिहिर पंगेरकर (गडप), आदिती चव्हाण (डेअर), उत्कृष्ट तांत्रिक अंग- सलंग, उत्कृष्ट प्रकाशयोजना- तनिष सनगरे (सलंग), संस्कार पांचाळ (गडप), निशिता पवार (गायब), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- गौरव कुलापकर (सलंग), सई थोरात (गडप), हर्ष बोंडाळे (आणि तोच हा), पुरुष व्यक्तीरेखा- हृषिकेश कोतवडेकर (गडप), आर्यन निकम (सलंग), वेदांत चव्हाण (डेअर). स्री व्यक्तीरेखा- शर्वरी आडिवरेकर (सलंग), आभा साखळकर (सलंग), सिद्धी बंडबे (डेअर), विनोदी व्यक्तीरेखा- मंथन शिवलकर (गडप), नेपथ्य- आर्यन निकम (सलंग), विघ्नेश जोशी (गडप), मुस्कान वाडकर (डेअर), सर्वोत्कृष्ट खलनायक- वरद आरेकर (गडप).
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 19-12-2024












