चिपळूण : कापड विक्रेत्याला ठार मारण्याची धमकी; सावकाराविरोधात गुन्हा दाखल

चिपळूण : गेल्या काही दिवसापासून थंडावलेल्या सावकारीने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. कोरोना कालावधीत व्यवसाय बंद राहिल्याने त्याला उभारी देण्यासाठी कापड विक्रेत्याने सावकाराकडून ५ लाख रूपये घेतले. त्याच्या मोबदल्यात दोन वर्षात तब्बल ३७ लाखांची परतफेड केली. व्याजाची रक्कम १ लाख ४५ हजार दर महिना भरण्यास नकार दिल्याने एका सावकाराने कपडे विक्रेत्याला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सावर्डे पोलिसांकडे संबंधीत सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव भालचंद्र सावंत असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद स्वानंद शांताराम बांबाडे (३८) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वानंद बांबाडे यांचे सावर्डे बाजारपेठेत कपड्याचे दुकान आहे. कोरोना कालावधीत दुकान बंद राहिल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. ओळखीचा असलेला वैभव सावंत हा व्याजी पैसे देण्याबाबत व्यवहार करतो, याची माहिती असल्याने बांबाडे यांनी वैभवकडून सप्टेंबर २०२१ मध्ये पहिल्या आठवड्यात ५ लाख रूपये १० टक्के व्याजदराने घेतले होते. या कर्जापोटी बांबाडे यांनी वैभव सावंत यास सप्टेंबर २०२१ ते २३ नोहेंबर या कालावधीत ३७ लाख रूपये दिले. हि रक्कम फोन पे, गुगल पे, योनो, फिनो या अॅप द्वारे तसेच काही रक्कम रोख स्वरूपात दिली आहे. तरी देखील वैभवकडून व्याजापोटी १ लाख ४५ हजार रूपये देणे असल्याचे सांगून त्याची मागणी करत होता. दर महिना ही रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगून त्यास नकार दिला. व्याजाची रक्कम देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून वैभव सावंत याने बांबाडे यांना त्यांच्या सावर्डे बाजारपेठेतील दुकानाच्या ठिकाणी तसेच घरी जाऊन ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. धमकी दिल्याने बांबाडे यांनी सावर्डे पोलिसांकडे वैभव सावंत याच्या विरोधात तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 19/Dec/2024