गुहागर : तालुक्यातील साखरीआगर येथील मच्छीमार रवींद्र नाटेकर यांचा २८ ऑगस्ट रोजी बोटीवरील खलाशाने निघृण खून केला व बोट पेटवून दिली. या बाबतचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी तसेच बोटीवरील सहखलाशांची चौकशी करून नाटेकर यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी करीत अखंड खारवी समाज रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातर्फे गुहागर तालुका खारवी समाज समिती गुहागर यांच्यावतीने मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने खारवी समाजबांधव सहभागी झाले.
मौजे साखरीआगर येथील रवींद्र नाटेकर यांच्यावर मासेमारी करताना त्यांच्याच बोटीवरील झारखंड येथील खलाशी म्हणून काम करणारे जयप्रकाश विश्वकर्मा याने सुरीने हल्ला करीत त्यांची हत्या केली. तसेच मासेमारी नौकेतील जाळीसह नौकेलाही पेटवून दिले. यामध्ये सुमारे सव्वा दोन कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. तसेच नराधमासह घटनेच्यावेळी उपस्थित बोटीवरील असणाऱ्या इतर खलाशांचीही निःपक्षपातीपणे चौकशी करून पोलिस तपास करण्यात यावा.
कारण सदर घटना प्रत्यक्षदर्शी घडत असताना बोटीवरील उपस्थित अन्य खलाशांनी कोणताही प्रतिकार केला नाही, त्यामुळे संशयाला वाव आहे, असे खारवी समाज संघटनेचे म्हणणे आहे. यावेळी खारवी समाज समिती तालुका गुहागर अध्यक्ष महेश नाटेकर, खलाशी संघटना अध्यक्ष सिताराम पटेकर, उपाध्यक्ष श्रीधर नाटेकर, नंदा रोहीलकर, कार्याध्यक्ष मारुती होडेकर, सहसचिव चैतन्य धोपावकर, मर्तंड नाखवा व विश्वनाथ म्हात्रे, करंजा रायगड अखिल महाराष्ट्र मच्छीमार महासंघ उपाध्यक्ष विष्णू नाटेकर, सागरी मच्छीमार अध्यक्ष डामू लोकरे, अनिल जाक्कर, प्रेरणा शिरगावकर, मनविता अडुरकर, सुमती जाधव, दीपस्वी कटनाक, माधवी धोपावकर, रमेश जाक्कर, संतोष आगडे आदींसह बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात, पूर्णवेळ मासेमारी, मच्छीमार असल्याचा परवाना मिळावा, दालनी, गिलनेट, ट्रोलींग, पर्ससीननेट, गिलनेट आदीप्रकारचे मासेमारी परवाने रद्द करावेत, डॉ. सोमवंशी अहवालामध्ये बदल करण्याविषयी मच्छीमारांचे शिष्टमंडळ नेमावे, जाळे खेचण्याच्या क्रेनवरील बंदी उठवावी, परराज्यातील बोटीचा प्रतिबंध करावा, खाडी, समुद्रातील प्रक्षण रोखावे, बंदी कालावधीमध्ये मच्छीमार बांधवाना उपजिविकेचे साधन नसल्यामुळे प्रत्येक नोंदणीकृत मच्छीमार संस्थेच्या सभासदांना प्रत्येकी प्रति महिना दहा हजार रुपये मानधन देण्यात यावे. तसे करताना मच्छीमार दारिद्य रेषेखाली असावा ही अट रद्द करण्यात यावी.
तसेच समुद्रामध्ये बुडून मच्छीमारांचा मृत्यू झाला तर किमान सहा महिने कालावधी वाट पाहून त्यांचा मृत्यू घोषित करण्यात यावा. तसेच अपघाती मदत दहा लाख रूपये मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 19/Dec/2024














