गणपतीपुळे : जेएसडब्ल्यू पोर्टमध्ये झालेल्या वायुगळतीच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासामुळे पालक संतप्त झाले असून, प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा-पुन्हा त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यातूनच पालकांमध्ये असलेला असंतोष बुधवारी बाहेर पडला. पालकांनी जेएसडब्ल्यू पोर्टकडे जाणारा रस्ता रोखून धरला. त्या नंतर पोलिस ठाण्यावरही धडक दिली. यामुळे जयगडमध्ये वातावरण तणावपूर्ण झाले होते. कंपनीचा एलपीजी टँकरचा तळ शाळेजवळून हलवण्यात यावा, अशी मागणी यावेळी पालकांनी लावून धरली.
जयगड येथील जिंदल कंपनीच्या पोर्ट विभागातून एलपीजीची वाहतूक सुरू आहे. याच एलपीजी फॅसिलिटीजमधून गेल्या गुरुवारी वायुगळती होऊन जवळपास 70 हून अधिक विद्यार्थ्यांना त्रास झाला होता. काही प्रौढ व्यक्तींनाही याचा त्रास होत आहे. जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचारानंतर या विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना सोडण्यात आले होते. परंती 34 हून अधिक विद्यार्थ्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. श्वास घेणे, पोट दुखणे, मळमळणे असे त्रास होत असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास विद्यार्थ्यांना मोठा धोका उदभणार आहे.
बुधवारी आक्रमक झालेल्या ग्रामस्थ व पालक, शाळेशी संबंधित पदाधिकारी यांनी कंपनी विरोधात तीव्र आंदोलन केले आहे. यामध्ये आंदोलकांनी रास्ता रोको करून कंपनीच्या गाड्याही रोखल्या, कंपनीचे गेट बंद करुन घेत, ठिय्या मांडला. दीड दोन तासाहून अधिक वेळ हा प्रकार सुरु होता. पोलिसांकडून आक्रमक ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रकार सुरु होता. यानंतर सर्व ग्रामस्थ व पालक यांनी जयगड पोलीस ठाण्यावर धडक दिली.
जयगड परिसरातील शालेय मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागल्याने सर्व पालकांनी मोर्चा काढून कंपनी प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला. तसेच कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली असून केली आहे. यापुढे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो असे मत ग्रामस्थांनी पोलिसांसमोर मांडले. त्यामुळे ग्रामस्थ पालकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जे एस डब्ल्यू कंपनीकडून 100 बेडचा सुसज्ज दवाखाना, तीन रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन दिले होते. लेखी आश्वासन देऊनही कंपनीने आपले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर धावपळ उडाली होती.
विविध मागण्या…..
या ठिकाणी रुग्णालयात तीन तज्ज्ञ डॉक्टर असावेत, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक विद्यामंदिर जयगड मधील विद्यार्थ्यांना व भविष्यात शिकत असणार्या सर्व विद्यार्थ्यांना व नागरिकांना लाईफ इन्शुरन्स काढून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर जेएसडब्ल्यू युनिटचे हेड दवे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा व योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तसेच यापुढे कंपनीकडून नागरिकांना व विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ शकतो म्हणून प्रशासनाने कंपनीकडून हमीपत्र घेण्यात यावे अशी मागणीही मोर्चादरम्यान केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 19-12-2024












