रत्नागिरी औद्योगिक वसाहतीत रसायनाच्या वासाने नागरिकांमध्ये घबराट

रत्नागिरी : मिरजोळे एमआयडीसी परिसरातील एका कंपनीतून मंगळवारी रात्री अचानक केमिकलचा तीव्र वास सुरु झाल्याने शहरातील साळवी स्टॉप, जे.के. फाईल्स, आरोग्य मंदिर परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. शेवटी प्रशासनाला पाचारण करण्यात आले होते.

रत्नागिरी तालुक्यातील जिंदल कंपनीतून वायू गळती प्रकरण ताजे असतानाच शहरात हा प्रकार घडल्याने नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्री ८ वा. नंतर वास येण्यास सुरुवात झाली. साधारण गॅससारखा हा वास असल्याने नागरिकांची धावपळ उडाली. प्रत्येकजण घरात जाऊन गॅस सिलिंडर तपासणी करताना दिसत होता. त्यानंतर नाक्या नाक्यावर नागरिकांनी एकच गर्दी केली. शेवटी पोलिस प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली.

संबंधित कंपनीत जावून प्रशासनाने तपासणी करत हा वास नेमका कशाचा आहे ? याची चाचपणी केली. हा वास केमिकलचा असल्याचे समजले. या वासाने कुठलीही जीवितहानी किंवा कोणता त्रास झालेला नाही. राजकीय पुढारींनी सुद्धा या घटनेची दखल घेत कंपनीत जाऊन जाब विचारला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 19-12-2024