खेड : शहरातील तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील दोघा कर्मचाऱ्यांनी सुमारे ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका वृद्धाने खेड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. जमीन मिळकतीच्या मोजणी व नकाशा देण्यासाठी ही आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार पांडुरंग रामचंद्र पेवेकर (वय ७२, रा. धामणदेवी, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तालुक्यातील धामणदेवी येथील जमीन मिळकतीच्या मोजणी व मोजणीचा नकाशा मिळण्यासाठी येथील भूमी अभिलेख कार्यालयात २३ डिसेंबर २०२२ ला मोजणीचा अर्ज दिला होता.
२८ मार्च २०२३ ला कार्यालयाचे कर्मचारी यांनी या जमीन मिळकतीत जंगल असल्याने मोजणी होऊ शकत नाही, असे सांगितले तसेच मोजणीसाठी पुन्हा पैसे भरा, असेही सांगितले. पैसे न भरल्यास तुम्हाला अडचणी निर्माण होतील व पुन्हा कधीही मोजणी होऊ शकणार नाही, असे सांगितल्यामुळे २८ मार्च २०२३ ला ५० हजार रुपये व त्यानंतर पुन्हा २० हजार रुपये असे एकूण ७० हजार रुपये दिले.
जमिनीची मोजणी न करता ऑक्टोबर २०२३ मध्ये चुकीचा नकाशा दिला, असे तक्रारदार पेवेकर यांनी पोलिसांना सांगितले. तक्रारदारांनी याची शहानिशा करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयात धाव घेऊन चौकशी केली तेव्हा त्यांना मोजणी झाली नसल्याचे व ही मोजणी २२ डिसेंबर २०२३ ला निश्चित केल्याचे सांगण्यात आले.
या मोजणीवेळी उपस्थित कर्मचारी यांनी ती मिळकत कोणी कच्छी यांना मोजून दिल्याचे तसेच त्याबाबतचा नकाशा व कमी-जास्त पत्रक करून दिल्याचे सांगितले. आर्थिक गैरव्यवहार करून खोटे नोटीस व कागदपत्रे रंगवून बनावट नकाशा तयार केला तसेच आर्थिक लुबाडणूक केली, अशी पेवकर यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबधितांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 28/Sep/2024