रत्नागिरी : घुडेवठार एकमुखी दत्त मंदिरात झोळी प्रदक्षिणेची परंपरा

रत्नागिरी : दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा… झोळी आली…. झोळी आली… अशा अभंगांने शहरातील परिसर दुमदुमला. तालसुरात भक्तिमय वातावरणात घुडेवठार येथील प्रसिद्ध पुरातन श्रीदत्त मठ व श्री एकमुखी दत्त मंदिरात झोळी नगर प्रदक्षिणा कार्यक्रम उत्साहात झाला. श्रीदत्त जयंती उत्सवात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगलेल्या या झोळी प्रदक्षिणेत शेकडो दत्तभक्त आनंदाने सहभागी झाले. साडेचारशे वर्षांची ही परंपरा आजही जपली जात आहे.

घुडेवठार येथे श्रीदत्तमठ व श्री एकमुखी दत्तमंदिर आहे. औदुंबर येथून या मठात पादुका आलेल्या आहेत. दरवर्षी या मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम रंगतात. वारकरी संप्रदायाप्रमाणे श्री दत्तजयंतीला झोळी प्रदक्षिणा केली जाते. श्री दत्तमठातून सकाळी श्री दत्तगुरूंची गाव प्रदक्षिणा सुरवात होते. घुडेवठार, दत्तमठ, दत्तमंदिर ते विलणकर वाडी, चवंडेवठार, तेलीआळी, पाटीलवाडी, मांडवी या ठिकाणाहून भिक्षा मागितली जाते. या आधी ही झोळी श्रीकांत बोरकर व आजोबा कृष्णा बोरकर असे पिढीजात सुरू आहे. यावेळी दत्तवेशात श्रीकांत बोरकर यांचा मुलगा समीर बोरकर यांनी गळ्यात रुद्राक्षांची माळ घालून भिक्षा मागितली.

शहरातील विविध वाडीतून भिक्षा मागून झाल्यावर झोळी प्रदक्षिणासोबत दत्तनामाचा जयघोष करणारे तसेच भजन म्हणणारे सर्वजण दत्तजन्माच्या अगोदर झोळीसहित मठात येतात. सायंकाळी दत्त जन्माच्यावेळी झोळी प्रदक्षिणेतील दिंडी यात्रेतील भजनीबुवा श्री दत्तमठात दाखल होतात. रुद्राक्षांची माळ मठात ठेवली जाते. त्यानंतर मंदिरातून सुरू होणाऱ्या दत्त पालखीत ही माळ दत्ताच्या गळ्यात घातली. असा विलोभनीय प्रसंग भाविकांना पाहता आला. झोळी प्रदक्षिणेसोबत दरवर्षी येथील दत्त प्रासादिक भजन मंडळ-मठ घुडेवठार आणि वाडीतील अनेक दत्तभक्त य प्रदक्षिणेला सहभागी झाले होते.

अभंगांनी वातावरण दत्तमय
प्रदक्षिणावेळी दिंडीयात्रेत दत्त हा माझा जीवन आधार, निघालो घेऊन दत्ताची पालखी, मज भेटून जाओ दत्त सख्या अवधुता, काय चुकले हो स्वामी समर्था, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, उत्सव बहुआनंदाचा स्वामी सद्‌गुरू नाथांचा अशा सुस्वर अभंगाने व गजराने परिसर भक्तिमय आणि दत्तमय झाला. दत्तभक्तांनी उत्साहात स्वागत केले. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, काही चुकले माकले. झोळी आली… झोळी आली… या अभंगाने सांगता करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 19/Dec/2024