अपयशातून शिकण्याची तयारी ठेवा : राहुल जोशी

रत्नागिरी : नवीन विचार करण्याची हिंमत आणि प्रत्येक अपयशातून शिकण्याची तयारी ठेवल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन एस. एम. जे. कन्सलिन्सचे संस्थापक राहुल जोशी यांनी व्यक्त केले. ते गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित उद्योजकता परिसंवाद कार्यक्रमात बोलत होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) उद्योजकतेवर परिसंवाद झाला. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना या संदर्भात योग्य मार्गदर्शन करणे होता. राहुल जोशी आणि ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत आंत्रप्रेन्युअर्सचे संस्थापक सीए सिद्धार्थ सिनकर यांच्यासह प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर प्रमुख उपस्थित होते. सिनकर यांनी जागतिक स्तरावर नेटवर्किंगचे महत्त्व आणि संधींचा योग्य उपयोग करण्यावर भर दिला.

दोन्ही मार्गदर्शकांनी विद्यार्थांना मार्केटिंग, नेतृत्व कौशल्ये, व्यवसाय नियोजन आणि सुरुवातीच्या काळातील अडचणीवर मात कशी करावी, यासारख्या महत्त्वाच्या मुद्दयांवर मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तरे सत्रात विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने भाग घेतला आणि बाजारातील बदल, भांडवल उभारणी, जोखीम व्यवस्थापन यांसारख्या अनेक विषयांवर प्रश्न विधारले, मार्गदर्शकांनी त्यांची उत्तरे अत्यंत सोप्या आणि प्रात्यक्षिक उदाहरणांसह दिली. डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांना या संधीचा उपयोग करून आपले भविष्य उज्वल करण्याचे आवाहन केले. डॉ. आनंद आंबेकर यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत अशा कार्यक्रमांचे महत्त्व विशद केले. या परिसंवादामुळे विद्यार्थ्यांना उद्योजकतेची दृष्टी मिळाली आणि त्यांचे आत्मविश्वासही वाढले.

या वेळी उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी, सहायक ग्रंथपाल उत्पल वाकडे, सारस्वत आंत्रप्रेन्युअर्सचे मनोज तेंडुलकर, सूर्यकांत कुलकणों, विद्यार्थी सचिव मीहिका केनवडेकर, स्वराज साळुंखे, पूर्वा कदम, अथर्व चव्हाण उपस्थित होते. या परिसंवादाला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 19/Dec/2024