‘धनेश’विषयीच्या अभ्यासगटावर प्रतीक मोरे यांची नियुक्ती

साडवली : देवरूखचे धनेश अभ्यासक प्रतीक मोरे यांची नियुक्ती ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरच्या (आययूसीएन) हॉर्नबिल स्पेशालिस्ट ग्रुप सदस्यपदी झाली आहे. सह्याद्री संकल्प सोसायटीच्या साह्याने मोरे हे कोकणात लोकचळवळीद्वारे धनेश संवर्धनाचे काम करत आहेत. मोरे यांच्या नियुक्तीमुळे धनेश पक्ष्याविषयी सुरू असलेल्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली आहे.

गेल्या दोन वर्षांत मोरे यांनी ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’द्वारे कोकणात धनेश पक्ष्यांविषयी लोकचळवळ उभी केली आहे. धनेश संवर्धन, संशोधन आणि जनजागृतीसाठी ते काम करत आहेत. या कामाची दखल घेऊन त्यांची नियुक्ती केली आहे. आययुसीएनचा भाग म्हणजे स्पीसीज सर्व्हयव्हल कमिशन (एसएससी).

सजीवसृष्टीचे अभ्यासक आणि संरक्षक संशोधक यांचे वेगवेगळे गट या एसएससीमध्ये आहेत. हत्ती, बेडूक, मासे, कवके, यावर काम करणारे गट आहेत. एखाद्या देशातील किंवा भागातील प्रजातींवर काम करणारे गटही आहेत. प्रत्येक गटाचे काम स्वतंत्र असले तरीही एका ठरलेल्या आराखड्यानुसार चालू असते. आययुसीएनच्या कामामध्ये लागणारी प्रजातींबद्दलची माहिती, त्या कुठे आणि कशा स्थितीत आहेत, त्यांना असलेले धोके कुठले आणि त्यांचे संरक्षण करायला काय उपाय करायला लागेल ही माहिती एसएससीचे गट पुरवतात. या माहितीच्या आधारावर अनेक महत्वाचे निर्णय घेतले जातात. हत्तींच्या शिकारीला परवानगी द्यावी अथवा नाही, पर्यावरण बदलामुळे कुठल्या बेडूक प्रजाती नामशेष होत चालल्या आहेत, धोकादायक तणे कुठली अशा प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे या गटांच्या संशोधनातून मिळतात. ‘हॉर्नबिल स्पेशालिस्ट ग्रुप’ हा देखील एसएससी गटाचा भाग असून, या माध्यमातून धनेश पक्षी संवर्धनाविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतात.

नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण, संवर्धन
जैवविविधता राखण्यासाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थातील प्रमुख म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झव्हेंशन ऑफ नेचर (IUCN). अनेक देश आणि सामाजिक संस्था याच्या सदस्य आहेत. नैसर्गिक अधिवास, त्यातील विविध प्रजाती आणि त्यांचा मानवासाठी होत असलेला वापर याचा अभ्यास करून सद्यः स्थिती जाणून घेऊन त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हे आययुसीएनचे प्रमुख काम आहे.

वन्यजीवांच्या संवर्धनाचे काम
प्रतीक मोरे हे मूळचे देवरूखचे. गेल्या काही वर्षांपासून कोकणातील वन्यजीवांच्या संवर्धनाचे काम ते करत आहेत. सडे संवर्धनासाठीदेखील ते प्रयत्नशील आहेत शिवाय सड्यांवर फुलणाऱ्या संकटग्रस्त वनस्पतींबाबतदेखील ते अभ्यास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 19/Dec/2024