संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते बावनदी अपघातप्रवण क्षेत्रात चौपदरीकरणाचे काम रडतखडत सुरू आहे. चौपदरीकरणाचे काम करताना सुरक्षेविषयक उपाययोजना न केल्यामुळे हे क्षेत्र धोकादायक बनले आहे. या क्षेत्रातील खड्डे त्वरित न बुजवल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा शिवसेना शाखाप्रमुख संजय कदम यांनी दिला होता. त्यानंतर महामार्गावर काम करणाऱ्या ठेकेदाराकडून तत्काळ खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
संगमेश्वर सोनवी पूल ते पुनर्वसन आणि शास्त्रीपूल ते संगमेश्वर या भागातील काम गेले तीन वर्षे रखडलेले आहे. रखडलेल्या कामाचा फटका स्थानिक व्यावसायिकांना बसत आहे. संगमेश्वर शास्त्रीपूल, पैसाफंड हायस्कूलजवळ तसेच अनेक भागात काम रखडले आहे.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना येथून धावणाऱ्या वाहनांची सुरक्षा घेणे आवश्यक आहे मात्र ठेकेदाराकडून अशी यंत्रणा उभी केलेली नाही, त्यामुळे महामार्ग धोकादायक ठरत आहे. महामार्गावर धोकादायक ठिकाणी मोठमोठे खड्डे काढून काम अर्धवट ठेवले गेले आहे. त्यामुळे या परिश्ररात वाहनांचे मोठे अपघात घडत आहेत. या गोष्टींकडे प्रशासनाचेही लक्ष राहिलेले नाही. चौपदरीकरणाच्या कामाला कोणी वाली नसल्याचे संगमेश्वर तालुक्यात होते.
रामपेठ वळण तसेच शासकीय विश्रामगृहासमोरील हटवण्याची मागणी स्थानिकांनी केली होती; मात्र धोकादायक वळणे हटवली जात नसल्याने अपघात सुरूच असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. महामार्गावर पडलेले खड्डे त्वरित बुजवण्यात न आल्यास आंदोलन करण्याचा इशारा संजय कदम यांनी दिला होता. त्यानंतर महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली. सोनवी पुलावरील खड्डे भरण्यात आले असून, सोनेरी ते शास्त्रीपूल या दरम्यानचे खडे बुजवण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
वाहतुकीसाठी लागतो अधिक वेळ
मुंबई-गोवा महामार्गावरून वाहने हाकत असताना चालकांना सर्वाधिक अडचण सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी व लांजा या तालुक्यांतील विशिष्ट भागात होतो. त्यामुळे मुंबईहून सिंधुदुर्गकडे जाण्यास निघालेल्या वाहनचालकांना या टप्प्यात अधिक वेळ घालवावा लागतो. हे टाळण्यासाठी लवकरात लवकर काम करावे, अशी मागणी चाकरमान्यांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 19/Dec/2024












