साडवली : देवरुख बसस्थानक परिसरात दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून ठेवल्यामुळे एसटीला अडथळा होत आहे. काहीवेळा वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागते. बाहेरून एसटी आगारात आणताना आणि बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या गाड्या अनेक वेळा एकमेकांसमोर येतात. त्यामुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.
एसटी बसस्थानकाबाहेर बाजारपेठ रस्त्यावर वाहनांची वर्दळ आहे. अनेकवेळा एसटी बसेसना वाहतूक कोंडी सुटेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. स्थानक परिसरातील सुरक्षारक्षक वारंवार खासगी वाहने बसस्थानकाबाहेर उभी करा, अशी सक्त ताकीद चालकांना देत असतात. तरीही खासगी वाहनचालक सक्तीला जुमानत नाहीत. यावर उपाय म्हणून बसस्थानक आवारात वाहतुकीला अडसर ठरेल, अशी वाहने उभी केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी संतप्त प्रवाशांनी केली आहे. प्रत्येक वाहनचालकाने जबाबदारी ओळखून शिस्त पाळली तर अशा अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. मुजोर झालेले खासगी वाहनचालक बेजबाबदारपणा करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. गेल्या काही दिवसांत बसस्थानकातील एसटी फेऱ्यांचे वेळापत्रक आधीच कोलमडलेले आहे. त्यात वाहतूककोंडी झाल्यामुळे अनेकवेळा एसटी बसेसना विलंब होतो. त्याचा फटका प्रवाशांनाही सहन करावा लागतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:49 PM 19/Dec/2024














