राजापूर : खरवतेत मानवाच्या हजारो वर्षांपूर्वीच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा

राजापूर : तालुक्यातील खरवते येथील सड्यावर मानवी देहाची ठेवण असलेली आणि हाती तलवार घेऊन योद्धयाची वेशभूषा परिधान केलेली मानवी आकृती आणि मानवी हाताचा पंजा, अशी दोन कातळशिल्पं सापडली आहेत. ती सड्यावरील जांभ्या दगडाच्या कातळात कोरलेली आहेत. त्यामुळे खरवतेच्या सडा परिसरातील मानवाच्या हजारो वर्षांपूर्वीच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा दृ‌ष्टिक्षेपात आल्या आहेत.

राजापूर तालुक्यातील बारसु, देवाचेगोठणे, देवीहसोळ, आदी भागांतील सड्यावर मानवाच्या हजारो वर्षांपूर्वीच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा सांगणारी वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्पं गेल्या काही वर्षात आढळली होती. त्यानंतर खरवतेत प्रथमच दिसलेल्या या कातळशिल्पांमुळे पुन्हा एकदा राजापूरचे नाव देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे.

निसर्गयात्री संस्थाप्रमुख, कातळशिल्प संशोधक सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि खरवते येथील ज्येष्ठ ग्रामस्थ गंगाराम चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच अभय चौगुले, उपसरपंच गौरव सोरप, ग्रामपंचायत सदस्य किशोर चौगुले, संतोष चौगुले, जान्हवी माटल, सत्यवती बावकर, वैशाली चौगुले, ग्रामपंचायत नेहाकुडाळी, ग्रामपंचायत देवीदास उबाळे, संजय आटल, केंद्रचालक भक्तो माटल, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षक चैत्रा गुरव, पर्यावरणप्रेमी प्रशांत चौगुले या टीमने या कातळशिल्पांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली होती. ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत या कातळशिल्पांसह सड्यावरील जैवविविधतेचे जतन आणि संवर्धन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या कातळशिल्पातून येथील पर्यटनाला संधी उपलब्ध होणार आहे

असे आहे कातळशिल्प
खरवतेच्या सड्यावरील त्या कातळशिल्पांमध्ये मानवी देहाची ठेवण असलेल्या मानवाकृतीचे कातळशिल्प ७ फूट लांब आणि ४ फूट रूदीच्या आकाराचे आहे तसेच मानवी हाताचा पंजा १ फूट लांब आणि अर्धा फूट रुंद आकाराचा आहे.

राजापूर पंचायत समितीने आयोजित केलेल्या पर्यटन विकास सभेत खरवते येथे कातळशिल्प असल्याची माहिती पुढे हे आती होती त्यानुसार सरपंच अभय चौगुले, उपसरपंच गौरव सोरप अन्य ग्रामपंचायत पदाधिकारी आणि पर्यावरणदूतांच्या सहकायनि शोध घेण्यात आला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत कातळशिल्पांसह जैवविविधतेचे जतन आणि संवर्धन केले जात आहे. – नेहा कुडाळी, ग्रामपंचायत अधिकारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 19/Dec/2024