एकही योजना बंद करणार नाही, दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

CM Devendra Fadnavis : जनतेला आम्ही जी जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलं. तसेच ज्या ज्या योजना आम्ही सुरु केल्या आहेत, त्यातील एकही योजना (Yojana) बंद होऊ देणार नसल्याचे आश्वासन देखील फडणवीसांनी दिले.

ते विधानसभेत बोलत होते. लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं आहे. लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्या खात्यावर टाकणार असल्याचेही फडणवीसांनी सांगितले.

लाडक्या बहिण योजनेच्या बाबतीत नवीन निकष नाहीत

लाडक्या बहिण योजनेच्या बाबतीत नवीन निकष काही नाहीत. योजना चुकीच्या पद्धतीनं वापरत असेल तर ते तपासणं गरजेचं आहे. कारण हा जनतेचा पैसा असल्याचे फडणवीस म्हणाले. समाजात चांगल्या प्रवृत्तीसारख्याच वाईट प्रवृत्ती देखील असल्याचे फडणवीस म्हणाले. आम्ही शेतकरी असतील, युवा असतील, वंचितांच्या संदर्भातील योजना असतील, ज्येष्ठांच्या संदर्भातील सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

मला शरद पवारसाहेबांचं आश्चर्य वाटलं

मारकडवाडीच्या मुद्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मला बाकीच्यांचे काहीही आश्चर्य वाटलं नाही, पण शरद पवारसाहेबांचं आश्चर्य वाटल्याचे फडणवीस म्हणाले. काँग्रेसने अनेकदा ईव्हीएमचा मुद्दा मांडला होता. पण शरद पवारसाहेबांनी यापूर्वी कधीही EVM चा मुद्दा मांडला नव्हता असले फडणवीस म्हणाले. यावेळी मात्र, पवारसाहेब असं म्हणाले की, छोटी राज्य आण्ही जिंकतो आणि मोठी राज्य हे जिंकतात. कर्नाटक, पश्चिम बंगाल ही छोटी राज्ये आहे का? असा सवाल फडणवीसांनी केला. मारकडवाडीत राम सातपुते यांनी जास्त मते मिळाल्यानंतर लोकांना धमकावण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. लोकांना धमकावलं होतं की, आपल्याला इथं बॅलेटवर मतदान घ्यायचं आहे, यामध्ये मतदान शरद पवार यांच्या पार्टीला मिळायला पाहिजे असं सांगितलं होतं. पण दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. जनतेनं आम्हाला दिलेलं बहुमत स्वीकारा. जनतेनं आम्हाला जो अधिकार दिला आहे. त्याचा अपमान करु नका असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठीला प्रथम राजभाषेचा दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला

मराठीला प्रथम राजभाषेचा दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यानंतर मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचे फडणवीस म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं भाषेच्या विकासासाठी भाषा भवन उभारणे, भाषेच्या प्रसारासाठी निधी मिळणार, मराठी भाषेतील विद्वानांसाठी केंद्र सरकारच्या वतीनं दोन पुरस्कार देण्यात येणार आहे. 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:37 19-12-2024