Ratnagiri : 250 कंपन्यांच्या सुरक्षेचे होणार ऑडिट; जिल्हा प्रशासनाचे आदेश

◼️ एमआयडीसीतील पाठोपाठच्या घटनांनी सतर्क

रत्नागिरी : जयगड येथील जिंदल पोर्टजवळील प्लांटसह लोटे एमआयडीसीतील रासायनिक प्रक्रिया कंपनीतील गॅस गळती आणि रत्नागिरी एमआयाडीसीमध्ये मंगळवारी रात्री दुर्गधीच्या प्रकारानंतर सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाने औद्योगिक वसाहतीमधील सुमारे २५० विविध प्रक्रिया कंपन्यांच्या सुरक्षेचे ऑडिट करण्याचे आदेश प्रदूषण मंडळासह एमआयडीसीच्या सुरक्षा विभागाला दिले आहेत. याला उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी दुजोरा दिला आहे.

दरम्यान, जिंदल पोर्टच्या वायू गळती प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत कंपनीतील एलपीजीविषयक कामकाज चौकशी पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

चार दिवसांपूर्वी जयगड येथील जिंदल पोर्टजवळील प्रकल्पातून वायू गळतीची विद्यार्थ्यांना बाधा झाली. त्याचबरोबर मंगळवारी (ता. १७) रात्री लोटे येथील एका रासायनिक पदार्थ बनविणाऱ्या खासगी कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कर्मचारीही जखमी झाले. तसेच रत्नागिरी एमआयडीसीजवळील परिसरात रात्री १० च्या सुमारास दुर्गधी येऊ लागली होती. ती दुर्गधी एमआयडीसी परिसरातील वायू गळतीतून झाल्याची भीती होती. या तिन्ही प्रकारांमुळे एमआयडीसीसह प्रक्रिया प्लांट परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वायू किंवा गॅस गळतीचे प्रकार भविष्यात टाळण्यासाठी केमिकल कंपन्यांसह अन्य प्रक्रिया कंपन्यांची सुरक्षेची व्यवस्थेची तपासणी केली जाणार आहे.

यामध्ये गळती टाळण्यासाठीच्या उपाययोजना, कंपन्यांमध्ये सुरक्षा अलार्म सिस्टीम आहे का, हे तपासले जाणार आहे. त्याचबरोबर वातावरणात वायूचे प्रमाण दर्शवणारी यंत्रणा एमआयडीसी परिसरात बसविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे.

रत्नागिरी, चिपळूण, लोटे एमआयडीसी परिसरातील २५० कंपन्यांची तपासणी केली जाणार आहे. तसे निर्देश जिल्हाधिकारी यांनी प्रदूषण मंडळ आणि एमआयडीसी विभागातील सुरक्षा विभागाला दिले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले.

जिंदल पोर्टला नोटीस
याबाबत जिल्हा प्रशासनाने जिंदल पोर्ट कंपनीला नोटीस दिली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून कंपनीतील एलपीजी विषयक कामकाज वायू गळती प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत बंद ठेवावे. अतितातडीच्या कामासाठी या कार्यालयाची पूर्ण परवानगी घेणे आवश्यक आहे, असे अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी जिंदल कंपनीला नोटीस दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:58 19-12-2024