Israel-Hezbollah conflict : इस्रायलचे लेबनाॅनच्या बैरूतमध्ये हवाई हल्ले; हिजबुल्लाह प्रमुखासह मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या संयुक्त राष्ट्रांमध्ये (यूएन) भाषणानंतर सुमारे तासाभराने इस्रायलने शुक्रवारी बेरूतमधील हिजबुल्लाच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्रे डागली.

या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून 90 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसराल्लाहची मुलगी झैनब मारली गेल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला आहे.हिजबुल्लाहने झैनबच्या मृत्यूला दुजोरा दिलेला नाही. इस्रायली चॅनल 12 ने त्याच्या मृत्यूची बातमी दिली आहे. पाकिस्तानी पत्रकार अहमद कुरेशी यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, इस्रायलने हल्ला केलेल्या कमांड सेंटरच्या ढिगाऱ्यात हिजबुल्ला प्रमुखाच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. ते म्हणाले की लेबनीज अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.

हिजबुल्लाह प्रमुखाच्या मृत्यूवरून सस्पेंस कायम

दरम्यान, रॉयटर्सने लेबनीजच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, इस्रायलच्या हल्ल्यानंतर हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाहशी संपर्क झालेला नाही. हल्ल्याच्या अनेक तासांनंतरही हिजबुल्लाहने नसराल्लाह बाबतीत कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. एका इस्रायली अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इस्रायलला सांगितले की, हा हल्ला झाला त्या ठिकाणी हिजबुल्लाचे उच्च अधिकारी बैठका घेत असत. हल्ल्याच्या वेळी हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाहच्या उपस्थितीबद्दल कोणतीही माहिती नाही. तथापि, हिजबुल्लाच्या जवळच्या स्त्रोताने यापूर्वी रॉयटर्सला सांगितले होते की नसराल्लाह जिवंत आहेत. यापूर्वी इराणच्या तसनीम न्यूज एजन्सीनेही ते सुरक्षित असल्याचे सांगितले होते. दरम्यान, त्यांच्या हल्ल्यात हिजबुल्लाहचा मिसाईल युनिट कमांडर मुहम्मद अली इस्माइल आणि डेप्युटी हुसेन अहमद इस्माइल ठार झाल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

खामेनी यांनी इराणमध्ये तातडीची बैठक बोलावली

न्यूयॉर्क टाईम्सच्या मते, बेरूतवर इस्रायली हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या घरी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली. बैठकीत इराणचे अध्यक्ष मसूद पझाकियान यांनी इस्त्रायली हल्ल्याचा निषेध केला आणि हा युद्ध गुन्हा असल्याचे म्हटले. खामेनी यांचे सल्लागार अली लारिजानी म्हणाले की, इस्रायल मर्यादा ओलांडत आहे. माणसे मारून तोडगा निघणार नाही. त्यांची जागा इतर घेतील. इस्रायलच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी लोक अधिक मजबूतपणे एकत्र येतील, असे ते म्हणाले.

लेबनॉनवर इस्रायलचा हल्ला सुरूच आहे

राजधानी बेरूतसह अनेक भागांवर इस्रायली लष्कराचा क्षेपणास्त्र हल्ला अजूनही सुरूच आहे. इस्त्रायलने बेरूतच्या दहियाह शहरात राहणाऱ्या लोकांना तातडीने हा परिसर रिकामा करण्यास सांगितले आहे. इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की हिजबुल्लाह इस्रायलवर हल्ला करण्यासाठी या ठिकाणांचा वापर करत आहे. इस्रायलने लेबनॉन सीमेवर अतिरिक्त रणगाडे आणि चिलखती वाहने तैनात केली आहेत. नेतन्याहू यांनी लष्कराला लेबनॉनमध्ये घुसखोरीसाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.

आमच्याकडे पोलादाच्या नसा आहेत

बेरूतमध्ये इस्रायली हल्ल्यानंतर पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले की, आमच्या शत्रूंना वाटले की आम्ही कोळ्याच्या जाळ्यासारखे आहोत, परंतु आमच्याकडे पोलादाच्या नसा आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की नसराल्लाह यांनी आपल्या भाषणात इस्रायलचे वर्णन कोळ्याचे जाळे असे केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 28-09-2024