खेड : चार वर्षांपूर्वी खेड तालुक्यातील चिंचघर वेताळवाडी येथे दोन कामगारांमध्ये किरकोळ वाद झाला होता. यातून राजू लक्ष्मण मोरे (42, रा.चिंचघर वेताळवाडी, खेड) याच्या गुप्तांगावर वर्मी मार लागून त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपीला खेड न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रुपेश राजबहाद्दूर कारकी (25,मूळ रा.नेपाळ, सध्या रा.कळंबणी माळवाडी, खेड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सरकारी पक्षातर्फे रत्नागिरी जिल्हा न्यायालयातून हा खटला (व्हीसी) व्हिडीओ कॉन्फरेंन्सिंगद्वारे चालवण्यात आला.
दरम्यान, न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व 1 हजार रुपये दंड, तो न भरल्यास 1 आठवडा साधी कैद आणि दुसर्या गुन्ह्यात सक्षम कारावास व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. रुपेश राजबहाद्दूर कारकी याच्या विरोधात प्रदोष प्रकाश सावंत यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांचा विटभट्टी, हॉटेल आणि राजकमल टूरिझमचा व्यवसाय आहे. त्याठिकाणी नेपाळी आणि स्थानिक कामगार होते. त्यातील राजू मोरे हा गेली 20 वर्षे त्यांच्या विटभट्टी व टूरिझममधील जलतरण तलावाची निगा राखण्याचे काम करत होता. दरम्यान, 20 मार्च 2020 रोजी आरोपी रुपेश कारकी हा फिर्यादीच्या हॉटेलवरील कुक आयुष श्रेष्ठ याचा मित्र असल्याने फिर्यादीकडे काम मागण्यासाठी आला होता. तेव्हा फिर्यादीने त्याला 21 मार्च रोजी राजू मोरे सोबत विटभट्टीवर कामासाठी पाठवून दिले होेते. त्यादिवशीच्या रात्री राजू हा जेवायला न आल्याने फिर्यादी मालकाने त्याला फोन केला, परंतू, फोन उचलल्यानंतरही तो काही बोलला नाही. पण फोनवर पलीकडे काहीतरी बाचाबाची सुरु असल्याचे त्यांना एकू आले होेते. त्यानंतर रात्री 11.30 वा. सुमारास फिर्यादीच्या भावाने आरोपी रुपेश कारकीला फोन करुन बोलावून घेतले. तेव्हा त्याच्या अंगावरचे कपडे मातीने माखलेले आणि चेहर्यावर ओखडलेले दिसून आले. दुसर्या दिवशी 22 मार्च रोजी कोरोना कर्फ्यू असल्याने कोणीही राजूचा शोध घेतला नाही. त्यानंतर 23 मार्च रोजी सर्वजण राजू मोरेचा शोध घेत होते. त्यावेळी फिर्यादीच्या राजकमल टूरिझममधील जलतरण तलावाच्या बाजुला राहणार्या साळुंखे यांनी आपल्याला 21 रोजी रात्री 11.30 वा. सुमारास जलतरण तलावाच्या बाजुला ओरडण्याचा आणि झटापटीचा आवाज ऐकू आल्याचे सांगितले. फिर्यादीने त्याठिकाणी जाउन पाहिले असता त्यांना राजूचा मृतदेह तेथील झाडीत दिसून आला. त्याच्या मृतदेहावर माती आणि पालापाचोला टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. त्यांनी याबाबत खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी तपास केला. तपासात 21 रोजी रात्री आरोपी रुपेश आणि राजू हे दोघेही घटनास्थळी दारु पिण्यासाठी बसलेले असताना राजू एका महिलेशी फोनवर बोलत होता. तेव्हा रुपेशने त्याचा फोन घेतला. या वादातून त्यांच्यात झालेल्या झटापटीत रुपेशने केलेल्या मारहाणीत राजूच्या गुप्तांगावर जबर मार बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे अॅड. मेघना नलावडे यांनी 17 साक्षिदार तपासले. त्यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे आणि दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून अतिरिक्त सत्र न्यायाधिश प्र.श.चांदघुडे यांनी आरोपीला भादंवि कलम 302 मध्ये जन्मठेप व 1 हजार रुपये दंड तो न भरल्यास 1 आठवडा साधी कैद आणि भादंवि कलम 201 मध्ये सक्षम कारावास व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 20-12-2024