गुहागरमध्ये ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

गुहागर : देशाच्या प्रगतीकरता विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड असणे महत्त्वाचे आहे. यामुळे प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील विज्ञान कला- कौशल्याला वाव मिळावा, त्यातून नवसंशोधनाला चालना मिळत असून या प्रयोगासह संबंधित प्रशाला, गुरुजन, विद्यार्थी यांचाही नावलौकिक होतो. यासाठीचे हे विज्ञान प्रदर्शन प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद केळकर यांनी केले. गुहागर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने आणि रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालशेत यांच्या वतीने ५२ वे गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गटविकास अधिकारी प्रमोद केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले, शाळांनी माझी वसुंधरा यामध्येही सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.

गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रयत शिक्षण संस्था सातारा जनरल कौन्सिल सदस्य प्रशांत पालशेतकर, शीतल पालशेतकर यांची उपस्थिती लाभली. स्कूल कमिटी सदस्य पंकज बिरजे यांनी स्वागत केले. जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुदेश कदम, मुख्याध्यापक संघाचे गुहागर तालुका अध्यक्ष गोरिवले, तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष जी. एल. पाटील, प्रमोद नेटके, बाबासाहेब राशिनकर, रवींद्र कोळी, सुहास गायकवाड तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

१११ प्रतिकृतींचा समावेश
गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रदर्शन सुरू असून, पालशेतमध्ये डॉक्टर होमी भाभा विज्ञाननगरी सजली आहे. या प्रदर्शनामध्ये एकूण १११ प्रतिकृती असून, यामध्ये प्राथमिक ६२, माध्यमिक २४, प्राथमिक शिक्षक १०, माध्यमिक शिक्षक ७, दिव्यांग प्राथमिक विद्यार्थी ३, दिव्यांग माध्यमिक विद्यार्थी २ आणि प्रयोगशाळा परिचर ३ अशा प्रतिकृतींचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 20/Dec/2024