कोकणात बंधारे मोहीम तीव्र करण्याची गरज

गुहागर : दरवर्षी कोकणात उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या प्रकर्षाने जाणवते. पाणीटंचाईच्या या संकटावर मात करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळा संपल्यावर मिशन बंधारे मोहीम हाती घेतली जाते. मात्र, सद्यःस्थितीत काही ठिकाणी बंधारे ओस पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे बंधारे मोहीम तीव्र करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोकणात विशेषतः मार्च महिन्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचे संकट उभे राहते. यावर मात करण्यासाठी अनेक गावांमध्ये शासनाकडून मिशन बंधारे मोहीम राबविण्यात आली. यासाठी शासनाकडून सुरुवातीला बंधारा बांधण्यासाठी साहित्य तसेच मजुरीदेखील दिली गेली. त्यामुळे या मोहिमेला नागरिकांचादेखील उस्फूर्त प्रतिसाद लाभला; मात्र कालांतराने ही बंधारे मोहीम काहीशी मंदावल्याचे दिसून आले, कारण यासाठी शासनाकडून बंधारे साहित्य तसेच मजुरी मिळणे बंद झाल्याने या मोहिमेला अनेक ठिकाणी तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामपंचायत स्तरावरदेखील आजही बंधारे बांधण्याचे आवाहन केले जाते.

मात्र, मोबदला आणि साहित्य उपलब्ध केले जात नसल्याने सध्या बंधारा बांधण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.

या वर्षी पाऊस उशिरापर्यंत पडल्याने पाणीसाठे लवकर आटणार नाहीत, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र, पावसाने पाठ फिरवल्यानंतर अनेक ठिकाणी पाणीसाठे आटल्याचे चित्र आहे. सहाजिकच यामुळे बंधारेदेखील अनेक ठिकाणी ओस पडले आहेत. ग्रामीण भागात श्रमदानातून बंधारे बांधण्यात आले आहेत; परंतु अनेक ठिकाणी हे बंधारे नदी-नाल्यांना पाणीसाठा नसल्याने तेदेखील पूर्णपणे कोरडे पडले आहेत. यासाठी शासनाने बंधारे मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे साहित्य पुरवठा व मोबदला दिल्यास ही मोहीम पुन्हा अधिक गतिमान होण्यास मदत होईल, असा सूर ग्रामीण भागातून निघत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 20/Dec/2024