रत्नागिरी : ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्यासाठी महावितरणने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे.
या योजनेत सहभागी होणाऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. या योजनेसाठी ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीनवेळा ऑनलाईन पद्धतीने वीजबिल भरणारे सर्व लघुदाब वीजग्राहक पात्र ठरणार आहेत. १ ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीजबिले भरणाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
महावितरणची ही योजना लघुदाब चालू वीजग्राहकांसाठी लागू असेल, ज्यांनी १ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे १ मार्च २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही. ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने वीजबिल भरून लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे. ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करत डिजिटल पद्धतीने वीजबिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पद्धतीने वीजबिलांचा भरणा करता यावा यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीजबिल भरणा सूट दिली जाते. वीजबिलाची किमान रक्कम १०० रुपये असणे आवश्यक आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 20-12-2024














