रत्नागिरी : राज्याच्या तुलनेत कोकणासह रत्नागिरीत महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण खूप कमी आहे. ज्या तक्रारी आहेत त्या बहुतांश कौटुंबिक वादाच्या आहेत. कार्यालय ठिकाणी होणाऱ्या छळाच्या दोन तक्रारी आल्या आहेत. त्यावर कारवाई केली जाईल. मात्र, कार्यालय अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्यात आलेली नाही, अशा सरकारी, खासगी संस्थांमध्ये कामगार आयुक्तांनी छापे टाकून आस्थापनांना ५० हजाराचा दंड ठोठवा किंवा कुलूप लावा असे आदेश देण्यात आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
चाकणकर म्हणाल्या, महिला आयोग आपल्या दारी ही संकल्पना आपण राबविली. त्याला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोकणात महिलांच्या छळाचे प्रमाण खूप कमी आहे. येथे महिलांचा सन्मान केला जातोय हे कौतुकास्पद आहे. आजच्या आढावा बैठकीत एकूण १३८ तक्रारी आल्या आहेत. त्या ८९ दावे कौटुंबिक आहेत. दोन तक्रारी महिलांच्या छळाच्या असून त्यांची दखल गांभीर्याने घेण्यात आली आहे. अन्य तक्रारी मालमत्तेच्या असून त्यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न आयोग करेल. सरकारी ३९३ कार्यालयापैकी केवळ १९५ ठिकाणी तर खासगी ४०० पैकी १९ ठिकाणीच समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची स्थापना न झालेल्या ठिकाणी कामगार आयुक्तांना छापा टाकून तत्काळ समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जे सरकरी किंवा खासगी कार्यालय समिती स्थापन करणार नाही. तिथे कामगार आयुक्तांकडून छापे टाकून त्या आस्थापनांना कुलूप ठोकून ५० हजारांचा दंड करण्याचे आदेश दिले आहेत, असे चाकणकर म्हणाल्या.
‘वन स्टॉप सेंटर’ला मंजुरी
अन्यायग्रस्त महिलांना तत्काळ मदत मिळाली पाहिजे. यासाठी रत्नागिरीत वन स्टॉप सेंटर आहे. मात्र, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड या भागांसाठी चिपळूण येथे नव्याने वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात येणार आहे. आजच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली असल्याचे चाकरण यांनी सांगितले.
जिल्ह्यात बलात्काराचे २३ गुन्हे
रत्नागिरीत बालविवाहाचे प्रमाणही कमी आहे. मात्र, बालविवाह होवूच नयेत यासाठी ग्रामपातळीसह पोलिस विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना चाकणकर यांनी दिल्या. गर्भपाताचे प्रमाणही अत्यल्प आहे. तरीही नियमित रजिस्टर तपासणी, सोनोग्राफी सेंटर तपासणी सुरुच ठेवा. मनोधैर्य योजनेच्या लाभासाठी ६९ प्रस्ताव आले आहेत. त्यातील २७ प्रलंबित असून, २९ मंजूर करण्यात आले आहेत. १३ प्रस्तावांना अनुदान देण्यात आले आहे. जिल्ह्यात बलात्काराचे २३ गुन्हे घडले असून, त्यातील २२ प्रकरणांत कारवाई झाली आहे. महिलांसाठी स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष, शाळेतील मुलीना दामिनी पथकाची ओळख, आदी उपक्रम राबविण्याचे आदेश चाकणकर यांनी दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 20/Dec/2024














