Ratnagiri : जयगड वायुगळतीबाधित पालकांच्या जेएसडब्ल्यू कंपनीकडे ‘या’ १६ मागण्या

रत्नागिरी : जयगड वायुगळती प्रकरणी वायुबाधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी जेएसडब्ल्यू कंपनीकडे १६ मागण्या सादर केल्या आहेत.

गेल्या १२ डिसेंबर रोजी झालेल्या वायुगळतीने जयगड येथील माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना वायुबाधा झाले.

तेथील विद्यार्थी, पालक आणि व्यवस्थापन समितीची संयुक्त सभा बुधवारी (दि. १८ डिसेंबर) झाली. या प्रकरणाच्या अनुषंगाने जयगड पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेड या कंपनीकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्या अशा

१) जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे मेडिकल रिपोर्ट द्यावेत.

२) शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांचा कायमस्वरूपी मेडिक्लेम करावा.

३) भविष्यात उ‌द्भवणाऱ्या सर्व आजारांची जबाबदारी कंपनीने घ्यावी.

४) शाळेच्या आवारात सुसज्ज रुग्णवाहिका त्याच बरोबर तज्ज्ञ डॉक्टर कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावेत.

५) विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी वेळच्यावेळी करावी.

६) कंपनीने गॅस वाहतूक व गॅस साठवणूक त्वरित बंद करावी.

७) कंपनीने १०० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभारावे.

८) ऊर्जा हॉस्पिटलमध्ये तिन्ही शिफ्टमध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित असावेत.

९) डॉक्टर कुंभार यांना ऊर्जा हॉस्पिटलमधून काढून टाकावे.

१०) ऊर्जा हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ नर्सेस नियुक्त कराव्यात.

११) डॉक्टरांच्या नावाची व वैद्यकीय पदवीची पाटी लिहिलेली असावी.

१२) विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उदभवणाऱ्या आजारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल न करता खासगी रुग्णालयात दाखल करावे आणि त्याचे वैद्यकीय बिल मिळावे.

१३) दिनांक १२/१२/२०२४ रोजीच्या वायुगळती घटनेशी संबंधित बाधित विद्यार्थ्यांना हॉस्पिटलचा व पालकांचा वैयक्तिक खर्च कंपनीकडून मिळावा.

१४) बाधित विद्यार्थ्यांचे काही पालक, जे.एस.डब्ल्यू. कंपनीमध्ये कर्मचारी असल्यामुळे, ते मुलांसोबत असल्यामुळे त्यांच्या गैरहजर दिवसांचाही पगार मिळावा.

१५) बाधित विद्यार्थ्यांच्या इतरत्र काम करणाऱ्या पालकांनाही आर्थिक मोबदला मिळावा.

१६) विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सकस आहाराची व्यवस्था करण्यात यावी.

या मागण्या पालक सभेत करण्यात आल्या. आता प्रशासन यापुढची काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:44 20-12-2024