रत्नागिरी : बाजारात फुलांना वाढली मागणी

रत्नागिरी : मार्गशीर्ष महिना हा विविध देवदेवतांच्या उत्सवाचा काळ असतो. सोबत घरोघरी श्री महालक्ष्मीची पूजा असते. तसेच आपल्याकडे तुळशीचे लग्न झाल्यानंतर लगेचच लगीन सराई सुरू होते. त्यामुळे सध्या बाजारात फुलांची मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. लग्न सोहळ्यात आणि धार्मिक पूजा विधी कार्यक्रमात पूजेसाठी फुलांची आवश्यकता असते. त्या कारणाने सध्या बाजारात फुलांची मागणी वाढलेली दिसून येत आहे.

यामुळे फूल विक्रेत्यांना अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे. सध्या लगीन सराई सुरू आहे. अलीकडच्या काळात लग्न समारंभात इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडून सजावटीची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यामुळे संबंधित कंपन्या मोठ्या प्रमाणावर फुलांची खरेदी करतात. त्याचबरोबर छोटे-मोठे सजावटी करणारे स्थानिक कलाकार यांनाही फुले सजावटीची कामे लग्न समारंभात मिळत असल्याने सध्या बाजारात फुलांची मागणी वाढलेली दिसून येत आहे. गेल्यावर्षी लग्नाच्या तारखा व लग्न योग कमी असल्याने गेल्या वेळी प्रलंबित राहिलेले लग्न तारखा यावर्षी मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मंगल कार्यालये यांच्या तारखा संपूर्ण भरभरून गेलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात फुलांची सजावट करणारे स्थानिक कलाकार मोठ्या प्रमाणात फुले खरेदीसाठी मुंबई अथवा कोल्हापूर येथील घाऊक फूल बाजारातून फुले खरेदीकरिता जाताना दिसतात.

सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे. या काळात घरोघरी श्री महालक्ष्मी देवीची पूजा, घट मांडणी केली जाते. त्यावेळी देवीच्या सजावटीसाठी फुले खरेदी केली जातात. गजरे, हार, वेण्या यांना बाजारात मोठी मागणी आहे. नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली आहे. निवडून आलेल्या नेत्यांना हार, बुके यांना मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी होती. आता मंत्री म्हणून शपथविधी पार पडला. यामुळेही हार, बुके यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच निवडून आलेल्या आपल्या नेत्यांचे बॅनर आदींनाही खूप मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने बॅनर बनविणाऱ्या व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर लग्न समारंभ तारीख पे तारीख असल्याने लग्नामध्ये लागणारे हार, तुरे यांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने फूल विक्रेत्यांचा व्यवसाय मोठ्या तेजीत आहे, असे दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात फुलांची मागणी अधिक वाढली आहे.

फूलशेती ही पुणे, अहमदनगर, चाकण, बारामती या भागातील शेतकरी बारमाही करताना दिसतात. जिल्ह्यात ठराविकच ठिकाणी फुलांची शेती केली जाते, मात्र ती पुरेशी नाही. अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बारमाही होत असतात. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनीही बारमाही फुलांची लागवड केली, तर त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळविता येईल.

पिवळ्या रंगाच्या फुलांना पसंती
दसरा, दिवाळी, गणेशोत्सव सणांप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा फुलांच्या मागणीचा हंगाम आहे. या काळातही पिवळ्या रंगाच्या फुलांना विशेष मागणी असते. विशेषकरून झेंडू, गुलाब, शेवंती या फुलांना चांगली मागणी असते. या फुलांचे चांगले उत्पादन हे अनेक भागात होत असते. मार्गशीर्ष महिना डोळ्यासमोर ठेवून शेतकरी या फुलांचे उत्पादन घेत असतात. तसेच मागणी चांगली असल्यानेही दरही मनासारखे मिळत असल्याने फूल उत्पादक व विक्रेत्यांना सध्या सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:47 PM 20/Dec/2024