Breaking : अखेर त्या वादग्रस्त शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

रत्नागिरी : अखेर त्या वादग्रस्त शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून या शिक्षण विस्तार अधिकाऱ्या बाबत अनेक तक्रारी येत होत्या. या तक्रारी प्रामुख्याने महिलांच्या बाबत होत्या. मात्र तरी देखील प्रशासन यावर कारवाई करीत नव्हते. दोन दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या रत्नागिरी दौऱ्यावर आल्या असता महिलांनी तसेच सामाजिक संघटनांनी त्यांची भेट घेऊन हा विषय मांडला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शुक्रवारपर्यंत संबंधित विस्तार अधिकार्‍यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने या अधिकार्‍यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याचे निलंबन करून मुख्यालय लांजा देण्यात आले आहे.

तीन महिन्यांपूर्वी रत्नागिरी तालुक्यातील एका शाळेतील मुख्याध्यापिकेला या विस्तार अधिकार्‍याच्या गैरवर्तनाला सामोरे जावे लागले होते. याबाबत त्या मुख्याध्यापिकेने या अधिकार्‍याविरोधात 24 सप्टेंबरला जि.प.कडे लेखी तक्रार केली होती. त्यामध्ये या महिला शिक्षिकेने ‘तो’ शिक्षण विस्तार अधिकारी अपमानकारक व मनात लज्जा होईल, असे वर्तन करत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. यानंतर 11 ऑक्टोबरला पुन्हा शहरातील एका शाळेतील शिक्षिकेने प्रेमाच्या गोष्टी बोलण्यास नकार दिल्याने ‘तो‘ शिक्षण विस्तार अधिकारी त्रास देत असल्याची तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारी प्रशासनाकडे दाखल केली होती. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते.