गुहागर मध्ये प्राध्यापकांना मारहाण प्रकरण: मारहाणीच्या निषेधार्थ आज मोर्चा

गुहागर : शैक्षणिक काम आणि परीक्षेबाबत होत असलेल्या अवैध गोष्टींना विरोध केल्यामुळे येथील खरे ढेरे महाविद्यालयातील चार प्राध्यापकांना काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८:३० वाजता घडली.

याविरोधात प्राध्यापक गोविंद भास्करराव सानप यांनी गुहागर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महेश जनार्दन भोसले, संदीप भोसले, रोहन भोसले (सर्व रा. गुहागर) अशी या संशयितांची नावे आहेत. गोविंद सानप यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ते त्यांचे सहकारी प्राध्यापक अनिल शशिकांत हिरगोड, संतोष विठ्ठलराव जाधव व नीळकंठ सखाराम भालेराव हे महाविद्यालयात जात असताना महाविद्यालयाबाहेर रस्त्यावर महेश भोसले, संदीप भोसले, रोहन भोसले व त्यांच्यासोबत असणाऱ्या चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी लाथाबुक्क्यांनी, काठीने बेदम मारहाण केली.

गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक कामात व परीक्षांमध्ये होणाऱ्या अवैध कामांना विरोध दर्शवल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली असल्याचे सानप यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी महेश भोसले, संदीप भोसले, रोहन भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गुहागर पोलिस करत आहेत.

मारहाणीच्या निषेधार्थ आज मोर्चा
विद्यार्थ्यांसमोर प्राध्यापकांना झालेली मारहाण ही पुरोगामी महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेतील एकमेव दुर्दैवी घटना आहे. गुहागरसारख्या सुसंस्कृत शहरातील शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या संस्थाचालक आणि त्यांचे गुंड सहकारी यांच्या अमानवी आणि जीवघेण्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी निषेध मोचाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा शनिवारी (ता. २१) दुपारी २ ते ४ च्या दरम्यान गुहागर कॉलेज ते तहसील कार्यालय असा काढण्यात येणार आहे. मोर्चाला रत्नागिरी जिल्हा उच्च माध्यमिक संघटना, गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक समिती, समता सैनिक दल या संघटनांनी पाठिंबा दिला. या मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बुक्टू संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजे व महासचिव प्रा. कुलकर्णी यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 21-12-2024