पर्यटनाचा आनंद घ्या मात्र परत येताना ते ओरबाडू नका : प्रा. श्रीवल्लभ साठे

संगमेश्वर : पर्यटनाला गेल्यावर त्या ठिकाणी आपले ठसे उमटल्याशिवाय आणि आठवणी शिवाय येऊ नका; पण येताना ते ओरबाडून येऊ नका, असे प्रतिपादन प्रा. श्रीवल्लभ साठे यांनी व्यक्त केले.

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून यावर्षी “पर्यटन आणि शांतता” या थीमचा विचार करून नवनिर्माण शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान व हॉटेल मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालय लोवले (संगमेश्वर) येथे “पर्यटन आणि शांतता” या विषयावर प्रा. साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ते म्हणाले की, ‘पर्यटनाला गेल्यावर त्या ठिकाणी आपले ठसे उमटल्याशिवाय आणि आठवणी शिवाय येऊ नका; पण येताना ते ओरबाडून येऊ नका. जेणेकरून त्या पर्यटन स्थळाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचता कामा नये’. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी कशाप्रकारे उपलब्ध होतील तसेच स्वतःचा व स्वतःच्या प्रदेशाचा आर्थिक विकास छोट्या-छोट्या माध्यमातून कसा साधता येईल याशिवाय जगभरातील व स्थानिक पर्यटन स्थळाविषयी उत्तमरीत्या मांडणी करून मार्गदर्शन केले.

त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट व हॉस्पिटलिटी स्टडीज या विभागाच्या वतीने जागतिक पर्यटन दिनानिमित्त “डिफ्रंट कंट्री आणि डिश” ही थीम आयोजित केली होती. त्याचे उद्घाटन प्राध्यापक साठे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शाखांमधील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संजना चव्हाण यांच्या अध्यक्षीय मनोगताने झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा. प्रशांत जाधव व आभार प्रा. नेमण यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 28/Sep/2024