खेडमध्ये गोवंश हत्येच्या घटनेने तणाव

खेड : तालुक्यातील खेड शहर ते खारी मार्गावर असलेल्या नवीन देवणे पुलाखाली रविवारी सायंकाळी पाच ते सहा गोवंशाचे अवयव आढळले. त्यामुळे घटनास्थळ व परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

खेड तालुक्यात रविवारी दि.22 रोजी सायंकाळी देवणे पूल परिसरात खाडी मार्गावर गोवंश हत्येचे वृत्त पसरल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर याची माहिती समजताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी पोलिस कर्मचार्‍यांची जादा कुमक मागवली होती. देवणे पुलाच्या खाली गोवंशाचे जे अवयव सापडले त्यांचा पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतले. मात्र, यावेळी संतप्त ग्रामस्थांनी संशयित समाजकंटक यांना अटक करण्याची मागणी करत रास्ता रोको केला होता.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे, महेंद्र भोसले, खारी नांदगावचे सरपंच राजेश पालकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. यावेळी माध्यमांसोबत बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख धाडवे यांनी ही घटना निंदनीय असून सायंकाळपर्यंत समाजकंटकांना अटक करण्यासाठी आम्ही पोलिसांना वेळ देत असून त्यानंतर आम्ही स्वतः त्यांना शोधू, असा इशारा दिला. त्यामुळे तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 23-12-2024