‘निवळी येथील महामार्गावरील उड्डाणपूल रद्द व्हावा’; ग्रामस्थ रस्त्यावर

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील उड्डाणपूल रद्द व्हावा, या मागणीसाठी निवळी आणि हातखंबा या दोन्ही गावांतील ग्रामस्थ शनिवारी रस्त्यावर उतरले होते. हा पूल रद्द करून येथे जमिनीवरून महामार्ग तयार करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते पिंट्या निवळकर यांनी दिला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी निवळी येथील कामाला गती देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निवळी बाजारपेठ परिसरातून जाणार्‍या या मार्गाच्या ठिकाणी उड्डाणपूल प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणाकडे तयार केलेला आहे. मात्र, येथील बाजारपेठेचा विचार करता महामार्ग बांधणी जमिनीवरूनच केली जावी. त्यासाठी उड्डाणपूल केलेला प्रस्ताव रद्द करावा, अशी आग्रही मागणी सुरूवातीपासून येथील ग्रामस्थ, व्यापारी संघटना यांनी केलेली आहे. याबाबत बांधकाम विभाग, खासदार नारायण राणे, आमदार नीलेश राणे यांनाही निवेदन या पूर्वी देण्यात आले असल्याचे ग्रामस्थांचे नेतृत्व करणारे पिंट्या निवळकर यांनी सांगितले. यावेळी निवळी व्यापारी संघटनचे अध्यक्ष संतोष पाध्ये यांच्यासह व्यापारी, व्यवसायिक, ग्रामस्थ तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

या सर्व मागण्यासाठी निवळी व लगतच्या हातखंबा येथील ग्रामस्थ, व्यापारी संघटना देखील आग्रही आहेत. पण या मागणीकडे प्रशासनाने, महामार्ग प्राधिकरणाने देखील गांभिर्याने विचार करावा, अन्यथा आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा यावेळी उपस्थित बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आला आहे.

समांतर महामार्गाची बांधणी करावी…
निवळी बाजारपेठेतून उड्डाणपुलाऐवजी जमिनीवरून समांतर महामार्गाची बांधणी केली जावी. तसा या बाजारपेठ परिसरातून जाणार्‍या महामार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोडदेखील केला जावा. जेणेकरून येथील व्यापारी, ग्रामस्थ यांना रहदारीसाठी कोणत्याही प्रकारे त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 23-12-2024