गुहागर : प्राध्यापकांच्या मारहाण निषेधार्थ गुहागरात मोर्चा

गुहागर : ‘शिक्षक वाचवा, शिक्षण वाचवा’, ‘गुहागर कॉलेज भ्रष्टाचारमुक्त झालेच पाहिजे’, ‘प्राध्यापकांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘गुन्हेगारांना अटक झालीच पाहिजे’, अशी घोषणाबाजी करत ‘बुक्टू’ या प्राध्यापक संघटनेने गुहागरमध्ये मोर्चा काढला. खरे-ढेरे भोसले कॉलेजमध्ये प्राध्यापक मारहाणीचा निषेध करत तहसीलदार कार्यालयपर्यंत मोर्चा काढून तहसीलदार परीक्षित पाटील यांना निवेदन देण्यात आले.

महाविद्यालयात काम करणारे प्रा. गोविंद भास्करराव सानप, प्रा. अनिल हिरगोंड, प्रा. संतोष जाधव हे १८ रोजी सकाळी महाविद्यालयात येत असताना गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सचिव संदीप भोसले, रोहन भोसले व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली होती. याबाबत त्यांनी तक्रार दाखल केली होती. या घटनेच्या निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राध्यापकांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांना आरोपींना कडक शासन करावे, प्राध्यापक व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला आरोपीकडून धोका असल्यामुळे त्यांना पोलिस संरक्षण मिळावे, खरे-ढरे भोसले महाविद्यालयात चालणाऱ्या बेकायदेशीर बाबींची सीबीआयमार्फत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी व शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य जपावे, गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या कारभाराची योग्य यंत्रणेकडून सखोल चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करावे व महाविद्यालयावर प्रशासक नियुक्त करावा, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व बुक्टू संघटनेचे अध्यक्ष गुलाबराव राजे, महासचिव प्रा. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केले. या आंदोलनात गुहागरसह महाराष्ट्रातून बहुसंख्य प्राध्यापक, पालक, विद्यार्थी, सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.

मोर्चात सहभागी संघटना
बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स युनियन, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ,
कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ, पदवीधर शिक्षक संघटना, समता सैनिक दल, बहुजन विचार मंच- गुहागर,
सामाजिक विकास केंद्र- शृंगारतळी या संघटना मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

महाविद्यालय परिसरात दहशत
दरम्यान, मारहाणीची ही घटना महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थी उपस्थित असताना घडली. मारहाण सुरू असताना महाविद्यालयातील अनेक विद्यार्थिनी रडत होत्या. विद्यार्थी महाविद्यालयाच्या वर्गातून बाहेर पडण्यास धजावत नव्हते. आजही हीच दहशत महाविद्यालयाच्या परिसरात पाहायला मिळाली. गुरुवारपासून महाविद्यालयात येणाऱ्या संख्या १० ते १५ इतकीच आहे. प्राध्यापकही तणावाखाली आहेत. महाविद्यालय परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. आजच्या मोर्चातही महाविद्यालयातील एकही विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी सहभागी झाला नव्हता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 23-12-2024