नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. चार दशकांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. यादरम्यान, कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना रविवारी ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कुवेतमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’देत भव्य स्वागत केले. कुवेतमधील ‘बायन’ पॅलेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी, कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाही उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याशी विस्तृत चर्चा केली. यावेळी चर्चेत भारत-कुवेत संबंधांना नवीन गती देण्यावर भर देण्यात आला आहे. विशेषत: व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा क्षेत्रात परस्पर गुंतवणूक आणि व्यापारावर चर्चा झाली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.२१) कुवेतमधील गल्फ स्पीक लेबर कॅम्पला भेट देऊन भारतीय कामगारांशी संवाद साधला. मोदी म्हणाले की, “भारतात सर्वात स्वस्त डेटा (इंटरनेट) आहे आणि जर आपल्याला जगभरात किंवा भारतात कुठेही ऑनलाइन बोलायचे असेल तर त्याची किंमत खूपच कमी आहे. तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केले तरी खर्च खूपच कमी आहे. लोकांची मोठी सोय आहे, ते दररोज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलू शकतात.
भारत, कुवेतमध्ये शतकानुशतके जुने संबंध
भारत आणि कुवेतमध्ये शतकानुशतके जुने संबंध आहेत, सागरी व्यापार त्यांच्या ऐतिहासिक संबंधांचा कणा आहे. कुवेतला भारतीय निर्यात आता २ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे आणि भारतातील कुवेत गुंतवणूक प्राधिकरणाची गुंतवणूक १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. कुवेत हा भारताचा एक महत्त्वाचा ऊर्जा भागीदार आहे, जो भारताच्या कच्च्या तेलाच्या गरजांपैकी ३ टक्के गरजा पूर्ण करतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 23-12-2024