मुंबई : मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ओबीसी समाजातील संघटना, आघाड्या, संस्था यांच्या सभा, बैठका घेत आहेत.
एकीकडे छगन भुजबळ सातत्याने अजित पवार यांच्यावर टीका करताना तीव्र नाराजी बोलून दाखवत आहेत, तर दुसरीकडे छगन भुजबळ मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळत आहेत. याचाच एक भाग म्हणून छगन भुजबळ यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यावेळी समीर भुजबळ हेही उपस्थित होते. या भेटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमके काय झाले, याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
मंत्रिमंडळात भाजपाच्या वाट्याचे एक मंत्रीपद रिक्त आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील नाराज आमदार लक्ष ठेवून आहेत. भाजपामधील कोणाची यावर वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यातच नाराज असलेले छगन भुजबळ मंत्रिपदासाठी भाजपामध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. छगन भुजबळ सातत्याने आपली नाराजी बोलून दाखवत आहेत. छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत, त्यांना मंत्रिमंडळात न घेतल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. काही समर्थक आता भाजपसोबत चला असे जाहीरपणे आवाहन करत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट महत्त्वाची ठरत आहे.
छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ४० मिनिटे चर्चा
छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुमारे ४० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, मी आणि समीर भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत अनेक गोष्टींची चर्चा झाली. काय काय घडले, काय काय सुरू आहे, यावर चर्चा केली. वृत्तपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी मी पाहिल्या आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. महायुतीला महाविजय मिळाला, त्यात ओबीसींचे पाठबळ मोठ्या प्रमाणात होते. ओबीसी समाजाचा या विजयात मोठा वाटा आहे. इतर घटकांचाही वाटा आहेच. परंतु, विशेष करून ओबीसींनी महायुतीला जो आशीर्वाद दिला, त्याबाबत आपण सर्वांचे आभार मानले पाहिजेत. हे लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थिती ओबीसींचे नुकसान होणार नाही, याची काळजी मला खूप आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाहीत, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
दरम्यान, राज्यात ज्या घडमोडी सुरू आहेत, त्याची कल्पना आहे. मुलांना शाळांना सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि वेगळे वातावरण आहे. एक आठ ते दहा दिवस मला तुम्ही द्या. आठ ते दहा दिवसांनंतर आपण पुन्हा भेटू, बोलू. निश्चितपणे चांगला मार्ग यातून शोधू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच ओबीसी नेत्यांना विनंती करत आहे की, आम्ही यावर साधक बाधक चर्चा करत आहे. आता शांततेने घेऊया, असा निरोप दिला आहे. १० ते १२ दिवसांत जे काही चांगले करता येईल, जो मार्ग काढता येईल, तो काढूया, असे सांगितल्याचे भुजबळ म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. ओबीसींची नाराजी दूर करावीच लागेल, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 23-12-2024