नीलकमल बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी दापोलीतील आरिफ बामणे ठरले ‘देवदूत’

दापोली : गेटवे ऑफ इंडिया जवळ अरबी समुद्रात नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीडबोटीने धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर बचावकार्यासाठी आरिफ बामणे हे चक्क समुद्रातील देवदूतच बनून आले आणि 20ते 25 जणांना वाचविण्यात यश मिळविले. यात एका साडेतीन वर्षाच्या मुलीचा समावेश होता.

आरिफ बामणे हे मुळचे दापोली तालुक्यातील दाभोळ येथील रहिवासी आहेत. ते मुंबई येथे पायलट बोटीवर कामाला आहेत. ही घटना घडली तेव्हा देखील ते आपली सेवा बजावत होते. त्याचवेळी बामणे काम करत असलेल्या बोटीवर सूचना मिळाली. की, प्रवाशांसह गेटवे जवळच समुद्रात बोट दुर्घटना घडली असून बोट बुडत आहे. त्यानंतर बामणे यांच्या बोटीचा 18 ते 20 मिनिंटाचा जो प्रवास होता. तो 8 ते 10 मिनिटात वेगाने प्रवास करत दुर्घटना घडलेल्या बोटीजवळ आरीफ बामणे ज्या बोटीवर होते, ती बोट पोहोचली. तेथे पोहोचल्यानंतर बचावासाठी होणारा आक्रोश मन पिळवटून टाकणारा होता. चारीबाजूने आक्रोश होत होता. सगळीकडून आम्हाला वाचवा… वाचवा असा आवाज अशा किंकाळ ऐकू येत होत्या. सगळेच मदत मागत होते. त्यामुळे काय करावे, काहीच सूचत नव्हते. पण वेळ घालवून चालणार नव्हते. त्यामुळे आरिफ यांनी ज्यांच्याकडे लाईफ जॅकेट नव्हते. त्यांना प्रथम वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु सगळेच वाचवा वाचवा ओरडत असल्याने आम्हीपण गोंधळून गेलो होतो. जसजसे हाताला मिळत होते. त्यांना उचलून सुरक्षित करत होतो. हे बचाव कार्य करताना एक साडेतीन वर्षाची मुलगी दिसून आली. तिला उचलल्यानंतर तिचा श्वास थांबला होता. हातात श्वास थांबलेले लहान बाळ पाहिले डोळे पाणावले. पण बुडणार्‍यांना वाचविण्याचा थोडा अंदाज असल्याने तिला उलटे करून पाठीवरून दाब देत पाणी छातीतून काढण्यात आले आणि पुन्हा त्या लहान मुलीचा श्वास सुरू झाला आणि तिला वाचविण्यात यश आले.

आरिफ बामणे यांनी जवळपास 20 ते 25 जणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. 10 ते 20 मिनिटांचा ही धक्कादायक घटना आयुष्यभर माझ्या लक्षात राहिली. या आधी कधी इतका मोठा अपघात पाहिला नव्हता. घडले ते खूप भयानक होते, आमच्या आधी पेट्रोलिंग बोट व दुसरी बोट होती, पण आम्ही गेल्यानंतर अधिक लोकांना वाचविण्यात यश आले. मुख्य म्हणजे बोटीला धडक बसल्यानंतर आणि बोट बुडत आहे, हे समजल्यानंतर एकच आक्रोश बोटीवर होता.

सगळे पाण्यात पडल्यामुळे, पाणी नाकातोंडात जात असल्याने घाबरले होते. जणू मृत्यूच्या तोंडातून आरिफ बामणे जसजसे त्यांना वाचवत होते, ते सगळेजण पाया पडत होते, हे बघून खूपच हेलावून गेलो. या बुडणार्‍यांची तेथील परिस्थिती पाहून खूप वाईट वाटत होते. परंतु जेवढे शक्य झाले तेवढ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे आरिफ बामणे यांनी सांगितले. बोटीवरील मास्टर आरिफ बामणे यांच्यासोबत चालक किफायत मुल्ला तसेच तपसकर, नंदू जाना सर्व कर्मचारी यांनी बचावात मदत केली.

… त्यांचे जीव वाचवू शकलो नाही, त्याबद्दल वाईट वाटते
कोणालाही संकटात मदत करणे हे खूप महत्त्वाचे आहे, आज मला बोट दुर्घटनेतील लोकांना वाचविण्यास यश मिळाले. हे खूप माझ्यासाठी मोलाचे आहे. ज्यांचे जीव वाचविण्यात यश मिळाले त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. माात्र, ज्यांचे जीव वाचवू शकलो नाही, त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटत असल्याचे आरिफ बामणे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 23-12-2024