रत्नागिरी : शिवसेनेचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपल्यावर उद्योग मंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. ती यशस्वीपणे सांभाळताना मागील अडीच वर्षांत उद्योग क्षेत्राशी निगडीत घेतलेले निर्णय, राबवलेली धोरणे याची अंमलबजावणी करत गेल्या अडीच वर्षांत उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र ‘नंबर वन’वर आणण्यात आपल्याला यश आले. यापुढेही पाच वर्षांत महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात देशात पहिला क्रमांकावर राहील, असा आपला प्रयत्न राहणार आहे, असे राज्याचे नवनिर्वाचित उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
निवडणुकीत राज्यातील जनतेला उद्योगांसंदर्भात दिलेल्या प्रत्येक आश्वासनांची अंमलबजावणी या पुढील काळात करून आता प्रत्यक्षात उद्योग उभारणी करून रोजगार निर्मिती करण्याला प्राधान्य राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले.
उद्योग मंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रविवारी दुपारी हेलिकॉप्टरने ना. सामंत यांचे पाली येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांच्या तेथील निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मागील सरकारमध्ये अडीच वर्ष आपण उद्योग मंत्री म्हणून उत्तम काम केले, त्याची पोचपावती म्हणजेच पुन्हा उद्योग खाते मिळणे हिच आहे. अडीच वर्षाच्या कालावधीत उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीमध्ये देशाला प्रथम क्रमांक आणण्यात आपल्याला यश आले होते. उद्योगासंदर्भातील बदललेल्या धोरणांचा उद्योजकांना चांगला फायदा झाला. गडचिरोलीपासून रत्नागिरीच्या टोकापर्यंत आपण नव्या उद्योगांना मंजुरी मिळवून देण्यात यशस्वी झालो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 30 हजार कोटींचा डिफेन्स व सेमी कंडक्टर हे प्रकल्प आपण आणले. आता प्रत्यक्षात त्याची उभारणी करून त्यातून रोजगार निर्मिती कशी होईल, यासाठी प्राधान्य क्रमाने काम केले जाईल. त्याचबरोबर टाटा स्किल सेंटरच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण केले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात उद्योग भवन उभारून त्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देण्याचे काम सुरू आहे. डावोसमध्ये झालेल्या करारानुसार आता गुंतवणुकीला चालना मिळणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यानंतर प्रथमच मराठी भाषा मंत्रालय आपल्याला देण्यात आले आहे. मराठी भाषेला खूप मोठे महत्त्व आहे. भाषेचा दर्जा अधिक भक्कम करण्यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर विविध उपक्रम राबविले जातील. त्या संदर्भातील आराखडा तयार केला जाणार आहे. जनतेचा विश्वास संपादन करणारा विकास या पुढील काळात आपल्याकडून केला जाईल. अखिल भारतीय मराठी साहित्य, मराठी साहित्य, नाट्य क्षेत्राशी या विभागाचा जवळचा संबंध आहे. कवितेचे किंवा पुस्तकांचे गावही संकल्पनाही राबवली जाणार आहे. त्यामुळे साहित्यिकांशी संवाद साधून आवश्यक ते बदल, उपायोजना जनजागृती करून जास्तीत जास्त व्यवहारांमध्ये मराठी भाषेचा वापर कसा होईल, याकडे आपण प्राधान्याने लक्ष देण्यार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, पंचक्रोशीत कार्डियाक रुग्णवाहिकेसह अन्य तीन रुग्णवाहिका देण्याच्या सूचना आपण जिंदल कंपनी प्रशासनाला केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसात होणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत मिर्या एमआयडीसीचा मुद्दा विरोधकांनी पुढे आणला होता. स्थानिकांना एमआयडीसी नको आहे तर ती होणार नाही. हा निर्णय आपण त्याच वेळी घेतला होता. त्याची अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे मिर्या एमआयडीसी हा विषय पूर्णतः संपलेला आहे.
तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी येथे छोटे, छोटे उद्योग येणे आवश्यक आहे. त्यातून रोजगार निर्मिती करून मुंबईला तरुणांचा जाणारा लोंढा आपल्याला थांबवायचा आहे. यासाठी राजापूर, लांजा, मंडणगड, रत्नागिरी येथे छोट्या एमआयडीसी या पुढील काळात निर्माण केल्या जातील. रत्नागिरी तालुक्यात मेर्वी, निवेंडी येथे जागेची पाहणी सुरू आहे. स्थानिकांना विश्वासात घेऊनच एमआयडीसी बाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
बारसूबाबत तो शब्द 100 टक्के पाळणार..
बारसू प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामस्थांना तत्कालीन उमेदवार व राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी जो शब्द दिला आहे, तो शब्द 100 टक्के पाळला जाईल. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही.
वायुगळतीप्रकरणी दोषींवर कारवाई होणार
जिंदल कंपनीतून झालेल्या वायूगळतीमुळे 89 जणांना वायुबाधा झाली होती. त्यामध्ये 18 मुले, 69 मुली, 1 महिला, 1 पुरुषाचा समावेश होता. घटना घडलेल्याच्या दुसर्या दिवशी आपण रत्नागिरीत येऊन आढावा घेतला होता. आता पुन्हा एकदा आपण जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली आहे. अपर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीनेही घटनास्थळाची पाहणी केली आहे. यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल तर बाधित लोकांना नुकसान भरपाई देण्याची सूचना आपण कंपनीला केली, असेही उदय सामंत यांनी नमुद केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:03 23-12-2024