राजापूर : विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांनी राजापूर तालुक्याच्या रचनात्मक विकासावर तत्काळ लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील 101 ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना सोबत घेऊन आपला विकास आराखडा तयार करून हा आराखडा त्वरित पंचायत समिती कार्यालयांत सादर करावा, त्या आराखड्याला अनुसरून गावनिहाय कामांना निधीची तरतूद होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेमधील कामांच्या सद्यस्थितीतीचा आढावा घेण्यासाठी आ. सामंत यांनी पं.स.च्या किसान भवन सभागृहात सरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या गावांत गरज असलेल्या योजना, रस्ते, पाणी, आरोग्य, तसेच पायाभूत सुविधा यांचा प्राधान्यक्रम ठरवून तसा आराखडा तयार करावा, असे सूचित केले. हा आराखडा तयार करताना ग्रामपंचायतींनी संपूर्ण गावाला विश्वासात घ्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यात एकूण 101 ग्रामपंचायती असून त्या अंतर्गत सुमारे 230पेक्षा अधिक गावे आहेत. त्यामुळे असा आराखड्यांचा प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी सरपंच व ग्रामसेवकांवर आली आहे, असे आ. किरण सामंत यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:40 23-12-2024