ऑस्ट्रेलियाविरूद्धची तिसरी कसोटी संपल्यानंतर भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने प्रत्येक क्रिकेट चाहता भावूक झाला.
पंतप्रधाननरेंद्र मोदीही अश्विनच्या या घोषणेनंतर अचंबित झाले. मोदींनी पत्र लिहून समृद्ध क्रिकेट कारकिर्दीसाठी अश्विनला शुभेच्छा दिल्या. तसेच त्याच्या क्रिकेट क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्याचे तोंडभरून कौतुक केले. अश्विनच्या क्रिकेट कारकिर्दीतील भारत विरूद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) सामना, २०११चा वर्ल्ड कप अशा काही विशेष क्षणांचा उल्लेखही मोदींनी या पत्रात केला.
कॅरम बॉल, भारत-पाकिस्तान मॅचचा विशेष उल्लेख
पत्रात पंतप्रधान मोदी यांनी अश्विनच्या प्रसिद्ध कॅरम बॉलचा उल्लेख केला. या खास पद्धतीच्या गोलंदाजीच्या बळावर अश्विनने अनेकदा फलंदाजांना गोंधळात टाकले. मोदी पत्रात म्हणाले की, ज्याप्रमाणे फलंदाजांना अश्विनकडून ऑफ स्पिनची अपेक्षा असताना तो कॅरम बॉल टाकून त्यांना चकवायचा, तसेच त्याची निवृत्ती देखील एका कॅरम बॉलसारखी होती, ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती, परंतु सर्वांनाच धक्का बसला. याशिवाय मोदींनी T20 World Cup 2022 मधील भारत-पाकिस्तान सामन्याचाही उल्लेख केला. अश्विनने पाकिस्तान विरूद्ध सोडलेला वाइड बॉल आणि त्यानंतर विजयासाठी शेवटच्या चेंडूवर काढलेली १ धाव यातून अश्विनची बुद्धिमत्ता दिसून येते, असे मोदींनी नमूद केले.
आईच्या आजारपणातही मॅच खेळला…
या वर्षी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिके दरम्यान अश्विनला अचानक सामन्याच्या मध्यात चेन्नईला परतावे लागले, कारण त्याची आई आजारी पडली. आपल्या पत्रात, पंतप्रधानांनी यासाठी अश्विनच्या वचनबद्धतेचे देखील कौतुक केले. कारण तो त्याच्या आईला भेटून आला आणि दुसऱ्याच दिवशी परत मैदानात मॅच खेळायला उतरला. २०११चा वनडे विश्वचषक आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धांच्या विजेत्या संघातही अश्विनचा समावेश होता. त्यासाठी त्याचे अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:29 23-12-2024