मिसिंग, गर्भपाताबाबत कठोर कारवाईच्या सूचना : रुपाली चाकणकर

सांगली : ”राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यात मिसिंग आणि गर्भपाताचा प्रश्न गंभीर आहे. सोनोग्राफी सेंटरची पाहणी करून काही चुकीचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईची सूचना केली आहे,” अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चाकणकर म्हणाल्या, ”पाच दिवसांपासून दौरा सुरू आहे. जनसुनावणी आणि महिलांबाबतच्या प्रश्नांचा आढावा घेतला जात आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर याठिकाणी गर्भपाताचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आले आहे.

सोनोग्राफी सेंटरवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यात आतापर्यंत तीन कारवाई करण्यात आल्या आहेत.”

महिलांचा ‘राईट टू पी’चा प्रश्न गंभीर आहे. याबाबत महापालिकेचे आयुक्त यांच्यासोबत चर्चा करणार आहे. मुव्हेबल टॉयलेट उपलब्ध करून देता येतील का, याचा विचार केला जात आहे.

महिलांना यासाठीही पैसे मोजावे लागतात, यासंबंधी विचारणा केली जाईल. महामार्ग, गर्दीची ठिकाणे, बाजार, मॉल याठिकाणी या सेवा असायलाच हव्यात. महिला धोरणात काही मुद्दे राहिले होते, त्यावर काम सुरू आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारले, हे चुकीचे आहे. हा कार्यकर्ता पक्षाचा असूच शकत नाही, अशी टीका चाकणकर यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:29 23-12-2024