मुंबई : एसटी बस महामंडळात टप्याटप्याने इलेक्ट्रिक बस सुरू करणार आहोत. अगदी ग्रामीण भागात देखील इलेक्ट्रिक बस सुरू केल्या जातील. त्यासाठी ग्रामीण भागात सुद्धा चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
कोस्टल मार्ग हा वाढवण बंदरपर्यंत विस्तारित होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मंत्री झाल्यावर मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदाच आलेले प्रताप सरनाईक यांनी डॉ . अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात चाय पे चर्चा उपक्रमाद्वारे मीरारोड भागातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासह सिमेंट रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करावीत, पाणी पुरवठ्यात वाढ करावी, सीसीटीव्ही कॅमेरे वाढवावेत, दहिसर टोल नाका येथील कोंडी दूर करावी, अनधिकृत रिक्षा चालकांवर कारवाई व्हावी, भाईंदरमधून सुटणाऱ्या एसटी बस संख्या वाढवा आदी मुद्दे उपस्थित केले.
त्यावर बोलताना सरनाईक यांनी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे सांगत सरकार म्हणून मी असल्याने असलेल्या समस्या दूर करण्यासह विकासकामे वेगाने होतील असे सांगितले. टोल नाका हटवून केवळ अवजड वाहनांसाठी २ टोल मार्गिका ठेवण्यात येतील. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी शहराच्या विकासकामांसाठी सुमारे ३ हजार कोटींचा निधी मंजूर केला. पाणी पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो व रस्त्यांची कामे लवकर पूर्ण केली जातील जेणे करून वाहतूक कोंडी सुटेल असे ते म्हणाले.
राज्य परिवहन महामंडळात टप्प्याटप्याने इलेक्ट्रिक बस सुरू करणार असल्याचं सांगत अगदी ग्रामीण भागात सुद्धा इलेक्ट्रिक बस चालवल्या जाणार आहेत . त्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारली जातील असे सरनाईक म्हणाले. यामुळे इंधन खर्चात व देखभाल – दुरुस्तीमध्ये बचत, प्रदूषण टळेल तसेच नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार आहे.
प्रत्येक एसटी डेपोमध्ये अद्यावत व स्वच्छ असे स्वच्छता गृह केले जाणार आहे. रात्रपाळी करणाऱ्या एसटी चालक आदींसाठी झोपण्याची आणि आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा करणार आहे. ही कामे आपण प्राधान्याने हाती घेतल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:36 23-12-2024