पुणे : आज किसान सन्मान दिवस 2024 निमित्ताने पुण्यातील केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपस्थित होते.
आज भारताचे कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरीबांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा या कार्यक्रमावेळी शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.
काय म्हणाले शिवराज सिंह चौहान?
मी महाराष्ट्राचा जावई आहे. देवेंद्र फडणवीस माझे छोटे भाऊ आहेत. चौधरी चरण सिंग यांनी जवाहर लाल नेहरू यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या नीतीचा नेहमी विरोध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी देवाचं वरदान आहेत. तर देवाभाऊ महाराष्ट्राच्या जनतेचे जीवन बदलण्यासाठी मुख्यमंत्री झाले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शरद पवार कृषी मंत्री असताना 23 हजार बजेट होतं ते आता 1 लाख 27 हजार करोड आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे परंतू शेतीची प्रत पुढील पिढीसाठी चांगली राहिली पाहिजे. मी ग्रामविकास मंत्री देखील आहे. प्रत्येक गरिबाकडे स्वतःचं पक्क घर असलं पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आमचा प्रयत्न आहे. तिसऱ्यांदा मोदी सरकार निवडून आले आहे. यापूर्वी 6 लाखपेक्षा अधिक लोकांना घर मिळाली होती. 13 लाख 29 हजार महाराष्ट्रातील गरिबांना घरे भेटणार आहेत. पुढील एका वर्षांत ही घर भेटणार आहेत. ज्यांना यापूर्वी घर भेटले नाही, त्या सर्वांना स्वतःचे घर भेटणार आहे. ज्यांच्याकडे 2 चाकी गाडी आहे, त्यांना पण प्रधानमंत्री आवास योजनेतून घर भेटणार असल्याची घोषणा आज शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.
कार्यक्रमावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान बोलताना म्हणाले, माझा महाराष्ट्राशी सखोल संबंध आहे. मी महाराष्ट्राचा जावई आहे. मी ग्रामीण विकास मंत्री देखील आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार आहेत. देशातील कोणत्याही राज्याला मिळालेल्या राज्यापेक्षा ही संख्या जास्त आहे. आतापर्यंत एका राज्याला एका वर्षात मिळालेली ही सर्वाधिक घरे आहेत अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी मानले मोदींचे आणि चौहान यांचे आभार
तर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, केंद्र सरकारच्यावतीने महाराष्ट्रातील गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरीता, बेघरांकरीता, एका वर्षांमध्ये जवळपास वीस लाख घरे देण्याची घोषणा आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे, कोणत्याही राज्याला आत्तापर्यंत इतक्या संख्येने घरे मिळालेली नाही, जवळपास वीस लाख घरे आपल्याला मिळालेली आहेत. आवास प्लसमध्ये 26 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आहे. आता ही वीस लाख घरे मिळाल्याने अनेकांना घरे मिळणार आहेत, त्याचबरोबर पुर्वी जे निकष होते, त्यातील काही निकष हे शिथील करण्यात आले आहेत, ज्यांची नावे सुटली होती , जे खरे बेघर आहेत, अशा सर्वांना नव्या सर्वेक्षणात घरे देण्यात येतील, पुढील पाच वर्षांमध्ये सर्व बेघरांना घरे देण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. इतक्या संख्येने राज्याला घरे देण्याच्या निर्णयावरती फडणवीसांनी मोदींचे आणि चौहान यांचे आभार मानले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:41 23-12-2024