रत्नागिरी : मराठी भाषा हे खाते अतिशय संवेदनशील आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने भावनिक आहे. या खात्याकडे सगळ्यांनी अतिशय डाेळसपणे बघण्याची आवश्यकता आहे. संस्कारक्षम महाराष्ट्राला ताकद देणारे हे खाते आहे.
महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी हे उपयुक्त खात आहे, अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पाली (ता. रत्नागिरी) येथे पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, या खात्यामार्फत मराठी विद्यापीठ, चार महामंडळ चालविली जातात. अखिल भारतीय साहित्य संमेलन, विश्व साहित्य संमेलन या खात्यामार्फत हाेतात. या खात्याशी साहित्यिकांचा, कलाकारांचा संबंध येताे. या खात्यामार्फत मराठी वाङमय पुरस्कार दिले जातात. मराठी भाषेच्यानिमित्ताने तालुकास्तरापर्यंत चांगले उपक्रम राबविण्यासाठी आम्ही यशस्वी ठरू, असे ते म्हणाले.
केंद्रशासनाकडून अभिजात भाषेची जी यंत्रणा आहे, त्यामधून जाे निधी मिळवायचा आहे, ताे कराेडाे रुपयांचा निधीही महाराष्ट्रासाठी मिळवू, असे मंत्री सामंत म्हणाले. जास्तीत जास्त व्यवहारामध्ये मराठी भाषेचा उपयाेग झाला पाहिजे, यासाठी आम्ही सगळे कार्यरत राहू. मराठी भाषा विभागाचा वर्षभराचा आराखडा तयार केला जाणार आहे.
जिल्ह्यात पुस्तकांचे गाव करायचे आहे, कवितांचे गाव करायचे आहे, जिल्हानिहाय साहित्य संमेलन घ्यायची आहेत, युवा साहित्यिक, युवा कवी, युवा लेखक तयार करायचे आहेत. मराठी भाषेच खात महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी उपयुक्त आहे. शालेय शिक्षणापर्यंत मराठी, व्यवहारात मराठी, न्यायालयामध्ये मराठी भाषा अशा प्रकारचे विविध उपक्रम घेऊन मराठी भाषेचे काम करणार आहाेत.
मराठी माणसाला त्रास दिल्यास कारवाई
महाराष्ट्र सर्व जाती, धर्मांनी, पंथांनी जरी नटलेला असला, तरी मराठी माणसाला त्रास देणे किती महागात पडू शकते, हे शासनाने दाखविले आहे. मराठी माणसाला न्याय देण्यासाठीच महायुतीचे सरकार आहे, मराठी माणसाला जाणीवपूर्वक त्रास देण्याची भूमिका काेणी घेत असेल, तर त्याच्यावर कठाेर कारवाई केली जाईल ही शासनाची भूमिका आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:48 23-12-2024