रत्नागिरी : एमआयडीसी झाली की उद्याेग येतात आणि उद्याेग आले की बेराेजगारी दूर हाेते, ही संकल्पना घेऊन भविष्यात तालुकानिहाय एमआयडीसी उभारण्याचे आमचे नियाेजन आहे, अशी माहिती राज्याचे उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी पाली (ता. रत्नागिरी) येथील निवासस्थानी रविवारी आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री उदय सामंत यांचे पाली येथील हेलिपॅडवर आगमन हाेताच पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अडीच वर्षात औद्याेगिकदृष्ट्या मागे गेलेला महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत एक नंबरवर आणण्यात आम्ही यशस्वी झालाे आहाेत. गडचिराेलीच्या टाेकापासून काेकणपर्यंत विविध प्रकारचे काेट्यवधींचे प्रकल्प आणण्यामध्ये यशस्वी झालाे. उद्याेगजगत महायुतीच्या सरकारवर खुश असून, त्या सगळ्यांना साेबत घेऊन लहान उद्याेजकांपासून ते अल्ट्रा मेगा प्राेजेक्टपर्यंतचे जे उद्याेजक आहेत त्यांना समाधानी ठेवणे ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात राजापूर, लांजा, मंडणगडमध्ये नव्याने एमआयडीसी करत आहाेत. रत्नागिरीमध्ये मेर्वी, निवेंडी येथे जागा संपादन करून एमआयडीसी करत आहाेत. एमआयडीसी झाली की उद्याेग येतात आणि उद्याेग आले की राेजगार उपलब्ध हाेतात. त्यामुळे भविष्यात तालुकानिहाय एमआयडीसीची उभारणी केली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
पालकमंत्रिपदाबाबत समन्वय
पालकमंत्रिपद देण्यासाठी तिघांमध्ये समन्वय आहे. पालकमंत्रिपदाचे ९९ टक्के वाटपही पूर्ण झाले आहे. येत्या दाेन ते तीन दिवसांत स्वत: मुख्यमंत्री पालकमंत्री कोण असतील ते जाहीर करतील. रायगडचा पालकमंत्रीही जाहीर हाेईल, असे ते म्हणाले.
प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य
जिल्ह्यात आलेले प्राेजेक्ट दाेन वर्षांत पूर्ण झाले तर १५ ते ३० हजार राेजगार उपलब्ध हाेणार आहेत. १५०० मुलांना माेफत त्या कंपनीचे प्रशिक्षण देण्यासाठी परदेशातही पाठविणार आहाेत. हे प्रकल्प पूर्ण हाेण्यासाठी प्राधान्य राहणार आहे.
मिऱ्या एमआयडीसी आमच्या दृष्टीने रद्द
मिऱ्या एमआयडीसी ही आमच्या दृष्टीने रद्द झालेली आहे. रद्द करण्याच्या पुढच्या कार्यवाही आम्ही सुरू करू, आम्ही फसविणारे लाेकप्रतिनिधी नाहीत, ज्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांना मतदारांनी काय केले हे सगळ्यांना माहीत आहे. पण, मतदान मिळाल्यानंतर लाेकांना नकाे असलेले पुन्हा करणे हे याेग्य नाही. मिऱ्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार मिऱ्या एमआयडीसी रद्द झालेली आहे.
प्रकल्प आणले ही फसवाफसवी नाही
रत्नागिरी जिल्ह्याला आश्वासन दिलेले प्रकल्प, त्यांचे करार झालेले आहेत, त्याची अंमलबजावणीही सुरू झालेली आहे. आपण प्रकल्प आणले ही फसवाफसवी नव्हती, हे नुसत वचन नव्हते, तर ते प्रकल्प रत्नागिरीत उभे करण्याच्या दृष्टीने फार माेठी ताकद पुन्हा एका उद्याेग विभागामार्फत निर्माण करीत आहाेत. लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण करू.
राजापूरमध्ये प्रदूषणविरहित प्रकल्प आणू
राजापूरमध्येही प्रदूषणविरहित बेराेजगार मुला-मुलींच्या हाताला काम देणारे प्रकल्प आणू. त्यातून फार माेठा राेजगार उपलब्ध करू.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:15 23-12-2024