खेड : तीनबत्ती नाका येथे गोवंश हत्येचा आज निषेध

खेड : तालुक्यातील देवणे पूल परिसरातील नारिंगी नदीपात्रात रविवारी 22 रोजी गो-वंशाचे अवशेष आढळल्यानंतर हे कृत्य करणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. त्यातच सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास देवणे पूल येथील नदीपात्रात पुन्हा एकदा गो-वंशाचे अवशेष आढळून आले. चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी या प्रकरणातील तीनजणांना अटक करण्यात आल्याचे तसेच त्यांच्याकडून मांस व एक जिवंत बैल हस्तगत करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच नागरिकांनी पोलिसांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन श्री. राजमाने यांनी यावेळी केले.

दरम्यान, सोमवारी दि.23 रोजी सकाळी 10 च्या सुमारास आणखी गोवंशाचे अवयव देवणे पूल परिसरातील नारिंगी नदी पात्रात आढळून आले. त्यामुळे घटनास्थळी पुन्हा लोक जमा झाले होते. संतप्त जमावाकडून कोणतीही आगळीक होऊ नये, म्हणून पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी घटनास्थळी जादा पोलिस कुमक मागवली होती. दरम्यान, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी देखील खेडमध्ये भेट दिली आहे. या प्रकरणी सायंकाळी खेडचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेच्या संदर्भात माहिती दिली.

दरम्यान, घटनास्थळी जमलेल्या लोकांनी अज्ञातस्थळी बैठक घेऊन दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वीस पेक्षा जास्त दुचाकीवरस्वार तरुणांनी शहरातून फेरी काढून दुकानदार व व्यापार्‍यांना बंदचे आवाहन केले. मात्र त्यानंतर सकल हिंदू समाज खेडच्या नावे एक पत्रक सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले असून त्यामध्ये मंगळवार दि.24 रोजी सर्व व्यवहार बंद घेऊन सर्व धर्मियांनी सकाळी 10 वाजता शहरातील तीनबत्ती नाका येथे गोवंश हत्येचा निषेध करण्यासाठी जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 24-12-2024