रत्नागिरी : मारुती मंदिर परिसरातील बिल्डरचे कार्यालय चोरट्याने फोडले

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर परिसरातील बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय चोरट्यांनी फोडून ४० हजार रुपये चोरुन नेले. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रसाद प्रभाकर वाघधरे (५५, रा. रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे मारुती मंदिर परिसरातील विष्णूपंत जोगळेकर संकुल येथे ओमकार डेव्हलपर्स नावाचे कार्यालय आहे. १४ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कार्यालयाचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तसेच आतील ३६ हजार रुपये रोख, चार हजार रुपयांचा सीसीटीव्ही कॅमेरा व डिव्हीआर असा मिळून ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला अशी तक्रार रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले. पोलिसांना यावेळी मुख्य दरवाजाचे लॅच लॉक उचकटलेल्या अवस्थेत आढळून आले. श्वान पथकाकडून चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यामध्ये श्वान पथकाला यश मिळाले नाही. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.

चोरट्याने रोख रकमेसोबतच पुरावे नष्ट करण्यासाठी कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरा देखील चोरुन नेला. तर सीसीटीव्हीचे रेकॉर्डीग करणारा डिव्हिआर देखील चोरट्यांनी लांबविला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:10 17-09-2024