वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ

चिपळूण : चिपळूण शहराला पूरमुक्त करण्यासाठी शासनाची यंत्रसामुग्री व निधीसहीत नाम फाऊंडेशनचे सहकार्य घेतले जाणार आहे. हे काम जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने कोणतेही राजकारण न करता एकत्रित काम करूया. भविष्यात चिपळूण शहराला चांगला दर्जा मिळेल, असे काम करूया, असे मनोगत आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले. सोमवारी नलावडा बंधारा बांधकाम व नदीतील गाळ काढण्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, माजी नगरसेवक विजय चितळे, आशिष खातू, जलदूत शाहनवाज शाह, नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक मंगेश पेढांबकर आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. सोमवारी सकाळी शंकरवाडी नलावडा परिसरात प्रस्तावित बंधारा बांधकाम व वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ झाला.

यावेळी आ. शेखर निकम यांनी सांगितले की, शहरातील वाशिष्ठी, शिव नदीमधील गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. पहिल्या टप्प्यातील अडीच कोटी रुपये निधी शिल्लक आहे तर पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याच्या कामाला सद्यस्थितीत साडेसात कोटींचा निधी उपलब्ध आहे. हा निधी कमी पडल्यास जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध केला जाईल. पहिल्या टप्प्यात १५ लाख घनफूट गाळाचा उपसा करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात अधिक गाळ काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शासनाची यंत्रसामुग्री उपलब्धतेबरोबरच नाम संस्थेकडून यंत्रणा उपलब्ध करण्याचे प्रयत्न आहेत. या कामाला शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही.

पावसापूर्वी अर्थातच मे महिन्यापूर्वी बंधारा बांधून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. महायुतीमधील सर्वच नेते प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री अजित पवार यांचे सहकार्य मिळत आहे. त्याचबरोबर चिपळूण शहराला पर्यटनदृष्ट्या चालना मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पाटणमधील शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणार आहे.

शहरातील मैदानांचा अत्याधुनिक विकास करणे, उत्तम दर्जाचे रस्ते, उद्याने, भूमीगत गटारे अशाप्रकारे शहराचा विकास आराखडा नजरेसमोर ठेवून शहर चांगल्या दर्जाचे करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रलंबित सर्व कामे पाच वर्षात पूर्ण करणार आहोत. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून, यामध्ये कोणतेही राजकीय हेवेदावे नसावेत, अशी अपेक्षा आ. निकम यांनी व्यक्त केली.

पूरमुक्तीसाठी २ हजार २०० कोटींचा आराखडा
वाशिष्ठी व शिव नदी किनाऱ्यानजिक आठ ते दहा ठिकाणी नागरी वस्तीजवळ संरक्षक भिंती उभारण्यासाठी २८५ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्तावित आराखडा मान्यतेच्या अंतिम टप्प्यात आहे. तसेच शहर कायमस्वरुपी पूरमुक्त राहावे, यासाठी २ हजार २०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला जात आहे तर येत्या अधिवेशनात दहा कोटी निधीची तरतूद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 24/Dec/2024