…तर विरोधाची पर्वा न करता बारसू रिफायनरी उभारणार : खासदार नारायण राणे

रत्नागिरी : रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणातील तरुण-तरुणींना रोजगार मिळण्यासाठी बारसू रिफायनरी प्रकल्प होणे आवश्यक आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांमार्फत इच्छुक कंपन्यांशी आपण स्वतः बोलणार आहोत. त्या कंपन्या तयार असतील तर विरोधाची पर्वा न करता बारसू रिफायनरी कार्यान्वित करू, असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर खा. नारायण राणे यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी खासदार कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन बैठकीची माहिती दिली. खासदार झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच जिल्ह्यातील प्रमुख कामांचा आढावा घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई-गोवा महामार्ग, मिऱ्या-नागपूर महामार्ग यांच्या कामाची स्थिती जाणून घेतल्याचे ते म्हणाले.

रत्नागिरी विमानतळाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. विमानतळाविषयी केंद्र पातळीवर काही परवानग्या किंवा अन्य काही प्रश्न उअसतील तर आपण लक्ष घालून ते सोडवण्याचा प्रयत्न करु. पर्यावरण विषयक परवानगी असेल तर केंद्रीय मंत्र्यांना भेटून तो प्रश्नही मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चिपळूण येथे विमानतळ उभारण्याबाबत नागरिकांकडून मागणी आहे. त्यामुळे याठिकाणी जागा पाहणीची सूचना प्रशासनाला केल्याचे खा. राणे यांनी सांगितले.

जिंदल कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे एकूण ९० मुलांना बाधा झाली होती. या प्रकरणाला दोषी असलेल्या व्यक्तींवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना आपण जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना केल्या आहेत. कंपनीने सुरूवातीला दिलेल्या आश्वासनांपैकी ज्या आश्वासनांची पूर्तता केली नाही, याची माहिती आपण घेतली आहे. शंभर बेडचे सुसज्ज हॉस्पीटल उभारण्याचा शब्द कंपनीकडून देण्यात आला होता. तो अद्याप पूर्ण करण्यात आलेला नाही. कंपनी प्रशासनाने लवकरात लवकर हॉस्पीटलची उभारणी करावी, अशी सूचना खा. राणे यांनी केली तर जिल्हा रूग्णालयाच्या धर्तीवर चिपळूण येथे सुसज्ज सरकारी रूग्णालय उभारण्याचा प्रस्ताव करण्याची सूचना खा. राणे यांनी केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दहावी- बारावीमध्ये मेरीटमध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कोणत्या क्षेत्राकडे वळले जातात, याचा अभ्यास करून त्यांना आवश्यक मार्गदर्शक केंद्र लवकरच सुरू केले जाईल. तर स्पर्धा परीक्षेबरोबरच आएएस, आयपीएस अधिकारी तयार होण्यासाठी येथे पक्षामार्फत अॅकॅडमी सुरू करण्यात येणार असल्याचे खा. राणे यांनी सांगितले.

नितेश राणेंच्या मंत्रिपदाने आपण समाधानी
मी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्रिपदापासून अन्य मंत्रिपदे, विरोधी पक्षनेता, केंद्रीय मंत्री अशी पदे उपभोगली आहेत. आता माझे दोन्ही मुलगे आमदार आहेत. त्यातील नितेश राणे कॅबिनेट मंत्री आहे. वडील म्हणून आपण खूपच समाधान आहोत. नीलेश राणेही लवकरच मंत्री होतील, असा विश्वास खा. राणे यांनी व्यक्त केला.

शेकडो नागरिकांनी मांडल्या समस्या…

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. पहिल्यात दौऱ्यात शेकडो नागरिकांनी आपल्याकडे समस्या मांडल्या आहेत. या समस्यांचे निराकरण शंभर टक्के होईल. पुढील पाच वर्षात आता प्रलंबित असलेली विकासकामे शिल्लक राहणार नाहीत अशी ग्वाही खा. राणे यांनी दिली.

पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याची सूचना

राजापूर, चिपळूण दोन शहरांना पुराचा धोका आहे. पावसाळ्यापूर्वी अर्जुना, वाशिष्ठी नदीतील गाळ काढला गेला पाहिजे. या वर्षी दोन्ही शहरांना पुराचा धोका बसणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना आपण प्रशासनाला केल्याचे खा. राणे यांनी सांगितले. मार्चपर्यंत या दोन्ही ठिकाणचा गाळाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, असेही राणे यांनी नमुद केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:39 24-12-2024